लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता : ममता बॅनर्जी यांनी सरळ बर्मुडाच घालावा, म्हणजे त्यांचा जखमी पाय लोकांना स्पष्ट दिसेल, या भारतीय जनता पक्षाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला असून, तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी घोष यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
तृणमूल खासदार महुआ मोईत्रा यांनी तर दिलीप घोष यांची विकृत अशी संभावना केली आहे. मंगळवारी पुरुलिया येथे प्रचारसभेत बोलताना घोष यांची जीभ घसरली. नंदीग्राम येथे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पायाला दुखापत झाल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवस रुग्णालयात होत्या. सुटी झाल्यानंतर त्या जखमी पाय घेऊन व्हीलचेअरवरून प्रचार करीत आहेत. त्या प्रचाराबद्दल बोलताना दिलीप घोष यांनी, ‘लोक ममतांचा चेहरा पाहू इच्छित नाहीत म्हणून त्या पाय दाखवत आहेत. साडी घालत असतानाही ममता बॅनर्जी जखम झालेला पाय सारखा समोर दाखवत आहेत. एक पाय झाकणारी, दुसरा उघडा ठेवणारी साडी पहिल्यांदाच पाहतो आहे. त्यापेक्षा त्यांनी सरळ बर्मुडा घालावा’, अशी टीका केली.
घोष यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला असून, महिला नेत्यांबद्दल त्यांनी वापरलेल्या भाषेवरून त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली आहे.