लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकलमध्ये १७०० खाटा असताना कोविड रुग्णांसाठी केवळ ६०० खाटा उपलब्ध असणे योग्य नाही, यात आणखी ४०० खाटांची भर टाकून हजार खाटा करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. विशेष म्हणजे, गेल्या सात महिन्यांपासून मेडिकलमधील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी जीवावर उदार होऊन रात्रंदिवस कोविड रुग्णांना सेवा देत आहेत. परंतु बैठकीत त्यांच्या कार्याचे कौतुक न करता मेडिकलमध्ये काहीच काम होत नसल्याचा ठपकाही त्यांनी ठेवल्याचे सूत्राने सांगितले.
कोविड रुग्णांचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री टोपे यांनी शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता मेडिकलमध्ये बैठक घेतली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी आ. प्रकाश गजभिये, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कु मार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा आदी उपस्थित होते. प्राप्त माहितीनुसार, आरोग्यमंत्री टोपे यांनी आढावा बैठकीत सुरुवातीपासून मेडिकलमध्ये कोविडबाबत योग्य पद्धतीने काम होत नसल्याचा सूर आळवला. मुंबईमधील रुग्णसेवेची त्यांनी उदाहरणे दिली. शेवटी आहे त्या मनुष्यबळात कोरोनाबाधित रुग्णांसाठी तातडीने खाटा वाढविण्याच्या सूचना दिल्याचे समजते.प्रशासनाच्या चुकांचे खापर मेडिकलच्या माथीकोरोनाच्या सात महिन्यांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जम्बो कोविड हॉस्पिटल, मनपाचे कोविड हेल्थ सेंटर याच्या केवळ घोषणा केल्या, परंतु प्रत्यक्षात काहीच झाले नाही. आरोग्य विभाग केवळ आकडेवारी जमा करण्यापुरताच मर्यादित आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये सोयी उभ्या करण्यास प्रशासनाला हवे ते यश आले नाही. यामुळे आपल्या चुकांचे खापर आढावा बैठकीत मेडिकलच्या माथी मारल्याची चर्चा दिवसभर मेडिकलमध्ये होती.