मूर्तीवरील कारवाईचा बैठकीत आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील मूर्ती विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करा, पीओपी मूर्ती आढळल्यास त्या तात्काळ जप्त करून दुकानही सील करा, यासाठी पोलिसांची मदत घ्यावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले.
मनपातर्फे पीओपी मूर्तींवरील कारवाईसंदर्भात मंगळवारी आढावा घेतला. महापौर दयाशंकर तिवारी, आयुक्त राधाकृष्णन बी., आरोग्य समिती सभापती महेश महाजन, माजी स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके, उपायुक्त राजेश भगत, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते.
राज्य सरकारच्या आदेशानुसार श्रीगणेशाच्या पीओपी मूर्तीची खरेदी, विक्री व आयात यावर बंदी आहे. अशात नागपूर शहरात कुठेही पीओपी मूर्तीची विक्री होणार नाही यासाठी मूर्ती विक्री करणाऱ्या दुकानांची पारंपरिक मूर्तिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने तपासणीला गती द्यावी, असे निर्दश दिले.
...
दुकानासाठी परवानगी आवश्यक
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरात विविध ठिकाणी मूर्ती विक्रीची दुकाने लावण्यासाठी मनपाची पूर्वपरवानगी संबंधित झोनमधून घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने दुकानांची तपासणी करताना त्यांच्याकडे परवानगी आहे अथवा नाही याची शहानिशा केली जाणार आहे. परवानगी नसल्यास कारवाई केली जाईल.
...
चार फुटांवरील मूर्ती जप्त करा
सरकारी नियमानुसार घरगुती गणपती मूर्तीची उंची दोन फूट व सार्वजनिक गणेश मूर्ती चार फुटांपेक्षा जास्त असू नये, असा नियम आहे. पथकाद्वारे कारवाई करताना मूर्ती चार फुटांहून अधिक उंचीची असल्यास जप्त करावी. सहायक आयुक्तांनी स्वत: झोनमध्ये पोलीस प्रशासन, पारंपरिक मूर्तिकार संघटनेचे पदाधिकारी व मनपाच्या उपद्रव शोध पथकासह पाहणी करून पीओपी मूर्तींची विक्री आढळल्यास तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश राधाकृष्णन बी. यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिले.