नागपूर : नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अधिष्ठाता यांना खा. हेमंत पाटील यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध म्हणून ‘महाराष्ट्र स्टेट मेडिकल टिचर्स असोसिएशन’ने (एमएसएमटीए) निषेध नोंदवून शुक्रवारी काळ्या फितीबांधून रुग्णसेवा दिली.
‘एमएसएमटीए’ अध्यक्ष डॉ. समीर गोलावार, सचिव डॉ. अमीत दिसावल यांच्या नेतृत्वात मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांना निवेदनही दिले. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. गोलावार म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्रुटी असतील तर लोकप्रतिनिधीने त्यावर चर्चा करावी. समस्यांचे निराकरण करण्यास मदत करावी. परंतु नांदेडमध्ये ते न करता अधिष्ठात्यांना अपमानास्पद वागणुक दिली.
हा अपमान ‘एमएसएमटीए’च्या सर्व डॉक्टरांचा आहे. ही दादागिरी सहन केली जाणार नाही. त्यांनी जाहिररीत्या माफी मागावी. नाहीतर आम्ही सामूहिक रजेवर जावू, असा इशाराही डॉ. गोलावार यांनी दिला. यावेळी डॉ. उदय नारलावार, डॉ. रमेश पराते, डॉ. मोहन तांबे, डॉ. अर्चना देशपांडे, डॉ. गौर, डॉ. राजेश गोसावी, डॉ. अविनाश तुरुणकर, डॉ. महाकाळकर यांच्यासह अनेक वरीष्ठ डॉक्टर उपस्थित होते.