नागपूर : सार्वजनिक क्षेत्रातील साधारण विमा कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचारी संघटनांच्या जॉइंट फोरम ऑफ ट्रेड युनियन (जेएफटीयू)च्या आवाहनानुसार नागपुरातील कर्मचाऱ्यांनी बुधवारी एक दिवसाचा संप पुकारला. या संपामुळे कार्यालये ओस पडली होती. कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे कामकाजही ठप्प पडले.
केंद्र सरकारने घेतलेल्या खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात हा संप होता. यंदाचे अंदाजपत्रक सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन सरकारी बँका तसेच एका साधारण विमा कंपनीच्या खासगीकरणाची घोषणा केली होती. याचा विरोध दर्शविण्यासाठी १५ व १६ मार्चला बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. बुधवारी १७ मार्चला साधारण विमा कर्मचाऱ्यांनी संप केला, तर गुरूवारी १८ ला जीवन विमा निगमचे कर्मचारी एक दिवसाच्या संपावर जात आहेत.
नागपुरातील कर्मचाऱ्यांच्या संपाचा प्रभाव कामकाजावर पडला. कार्यालयातील कामकाज आणि आर्थिक व्यवहार ठप्प पडले. खासगीकरणाच्या विरोधासोबत ऑगस्ट २०१७ पासून प्रलंबित वतन करारावर चर्च करावी, सर्वांना ३० टक्के फॅमिली पेन्शन दिली जावी, पेन्शनचे अपडेशन केले जावे तसेच एन.पी.एस. रद्द करून १९९५ च्या पेन्शन योजनेचे सदस्य बनविले जावे आदी मागण्यांचा यात समावेश आहे.
शहरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे रॅली, निदर्शने टाळण्यात आले. मात्र जेएफटीयू संबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करून विरोध दर्शविला. एनआयसीओएचे राजेंद्र सरोज, एआयजीआयएससी-एसटीइडब्लूएचे प्रवीण डोंगरे, बीव्हीकेएसचे मंगेश कारंजकर, एमएसइबीचे कर्मचारी नेता जे. एस. पाटील, जीआयईएआयएचे कार्यकारी अध्यक्ष प्रदीप धरमठोक, व्होकेशनल टीचर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष युगल रायलू आदींचा यात प्रामुख्याने सहभाग होता.