नागपूर :एलआयसी ही एक स्वायत्त संस्था असून आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे. एलआयसी आपली ८० टक्के गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित असलेल्या सरकारी बॉण्डस व कर्जरोख्यामध्ये करीत असते. उर्वरित २० टक्के गुंतवणूक भारत सरकारच्या संसदीय समितीच्या शिफारसीनूसार केली जाते. अमेरीकेतील हिंडेनबर्ग संस्थेच्या अहवालाने गौतम अदानी समूहावर केलेले आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप गंभीर असले व त्याची दखल घेण्यास केंद्र सरकार टाळाटाळ करून जनतेच्या डोळ्यात धुळफेक करीत असली तरी विमाधारकांचा पैसा एलआयसीत शंभर टक्के सुरक्षित असल्याचा दावा अखिल भारतीय विमा पेंशनर्स असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष टी.के.चक्रवर्ती यांनी केला.
एलआयसीतील पेंशनर्सची प्रमुख संघटना विदर्भ विमा पेंशनर्स असोसिएशनचे २२ वे वार्षिक संमेलन मोहन नगरस्थित ‘सहकार जीवन’ हॅालमध्ये आज थाटात संपन्न झाले. संमेलनाचे उद्घाटन टी.के.चक्रवर्ती यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ विमा कामगार नेते रमेश पाटणे, मुख्य अतिथी अनिल ढोकपांडे, शिवा निमजे, पी.व्ही. मिलिंदकुमार, धनराज डोंगरे उपस्थित होते. वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासदांचा सत्कार करण्यात आला. संघटनेची नविन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. संचालन पी. व्ही. मिलिंदकुमार तर चंद्रशेखर बन्नागरे यांनी आभार मानले.