लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयांतर्गत दिव्यांगांच्या आरोग्य, कल्याण व विकासासाठी समेकित क्षेत्रीय केंद्र (सीआरसी) नागपुरात सुरू करण्यात आले आहे. नागपुरात सुरू झालेले हे केंद्र सर्व प्रवर्गाच्या दिव्यांगांसाठी क म्पोझिट सेंटर आहे. दिव्यांगांना मिळणाऱ्या सोयीसवलतींपासून त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया या केंद्राच्या माध्यमातून संचालित करण्यात येत आहे. या केंद्राच्या निर्मितीसाठी मेडिकल परिसरात ४ एकर जागा मिळाली आहे.दिव्यांगांचे आरोग्य, कल्याण व विकासासाठी नागपुरात सुरू झालेले हे केंद्र राज्यासाठी आहे. फेब्रुवारी २०१७ पासून सुरू झालेल्या या केंद्राशी विदर्भातील किमान १० ते १५ हजार दिव्यांग जुळलेले आहेत. त्यांना आवश्यकतेनुसार सुविधा पुरविण्यात येत आहे. या केंद्राचा उद्देश दिव्यांगांना सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्याचा आहे.या केंद्रातर्फे दिव्यांगांना त्यांच्या आरोग्य, कल्याण व विकासाच्या दृष्टिकोनातून शक्य तेवढी मदत केली जाते. पक्षाघात, बहिरेपणा, बोलण्यात अडचण, मतिमंद, सिकलसेल, हिमोफिलिया, पॅरालिसिस, दुरुस्त झालेले कुष्ठरोगी, ४ फुटापेक्षा कमी उंचीची व्यक्ती, अॅसिड अटॅक पीडित व्यक्ती यांना विविध सुविधा पुरविल्या जाते. त्याचसोबत येथे पुनर्वसनाच्या दृष्टीने अभ्यासक्रम व प्रशिक्षण देण्यात येते. सध्या हे केंद्र यशवंत स्टेडियमच्या क्रीडा प्रबोधिनी सभागृहात असले तरी, भविष्यात भव्य इमारत उभारण्यात येणार आहे. येथे दिव्यांगांना लागणारे विविध प्रमाणपत्र, त्यांना मिळणाऱ्या आरोग्याच्या सुविधा, आवश्यक उपकरणे, पुनर्वसनासाठी रोजगाराचे प्रशिक्षण, दिव्यांगांच्या प्रत्येक प्रवर्गानुसार देण्यात येणार आहे. या केंद्रात १७ तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. केंद्राचे प्रमुख पद हे संचालकांचे आहे. येथून २१ प्रकारच्या दिव्यांगत्वांना सेवा पुरविण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील अपंगांची लोकसंख्या२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात अपंगांची संख्या २९ लाख ६३ हजार ३९२ एवढी आहे. हा टक्का एकूण लोकसंख्येच्या २.०१ टक्के एवढा आहे. यात १६ लाख ९२ हजार २८५ पुरुष व १२ लाख ७१ हजार १०७ स्त्रिया आहेत. प्रवर्गनिहाय अंध व अल्पदृष्टी प्रवर्गातील दिव्यांगांची टक्केवारी ३७ आहे. कर्णबधिर व भाषादोष प्रवर्गात १३ टक्के दिव्यांग आहेत. अस्थिव्यंग प्रवर्गात ३६ टक्के तर मतिमंद प्रवर्गात १४ टक्के दिव्यांग आहेत.