लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चातर्फे संविधान चौकात शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण गेले. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजप ओबीसी मोर्चातर्फे देण्यात आला.
भाजपतर्फे शुक्रवारी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, माजी आमदार अनिल सोले, ओबीसी मोर्चा नागपूर महानगराचे अध्यक्ष रमेश चोपडे, अर्चना डेहनकर प्रामुख्याने उपस्थित होते. राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचा इम्पिरिकल डाटा सादर न केल्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण स्थगित झाले आहे. मनपा निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. वॉर्डांचे सीमांकनदेखील करण्यात येत आहे. मात्र या निवडणुकीत ओबीसींना राजकीय आरक्षण राहणार नाही. अशास्थितीत नागपूर महानगरपालिकेची निवडणूक घेणे हा ओबीसी समाजावर भयंकर अन्याय ठरेल व ओबीसी समाज हे खपवून घेणार नाही. जोपर्यंत ओबीसीचे राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नागपूर महानगरपालिकेची निवडणूक घेण्यात येऊ नये अन्यथा नागपूर शहरातील सहा विधानसभा क्षेत्रात व वॉर्डस्तरावर जनआंदोलन उभे करण्यात येईल, अशी भूमिका भाजपतर्फे मांडण्यात आली. भाजपच्या शिष्टमंडळातर्फे मनपा आयुक्त व विभागीय आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले.