गणेश हूड, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: जिल्हा परिषदेत शिक्षकांची ४ हजार ४१९ पदे मंजूर आहेत. यातील ३ हजार ६९१ कार्यरत असून, ७२५ पदे रिक्त आहेत. आंतरजिल्हा बदलीप्रक्रियेतून शिक्षकांना जिल्ह्याच्या शैक्षणिक सेवेत आण्याची प्रक्रीया सध्या सुरू आहे. मात्र नागपुरात बदलून येण्यास शिक्षकांचा फारसा प्रतिसाद दिसत नाही. जिल्ह्यात रिक्त जागा ७२५ असताना केवळ ८९ शिक्षकांनीचआंतरजिल्हा बदलीने येण्यास पसंती दर्शविली आहे.
जिल्हा परिषदेच्या दोनशिक्षकी शाळा बहुतांशी ठिकाणी एकशिक्षकी झाल्या आहेत. येथे शिक्षकांची ७२५ वर पदे रिक्त आहेत. या पदभरतीसाठी शासनाचे पोर्टल सुरू व्हायचे नाव घेत नाही. विविध जिल्ह्यांतून ८९ शिक्षक नागपुरात येणार आहेत तर नऊ शिक्षक इतर जिल्ह्यांमध्ये बदलीने जाणार आहेत.
जिल्ह्यात १५१२ शाळा असून येथे शिक्षकांची चार हजारांहून अधिक पदे मंजूर आहेत. यातील अनेक शाळा द्विशिक्षकी होत्या. आता त्या एकशिक्षकी झाल्या आहेत. अशातच २०१२ पासून भरतीप्रक्रिया बंद आहे. शिक्षक सेवानिवृत्त होत असल्याने रिक्तपदांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे एकाच शिक्षकाला सर्व विषय शिकवावे लागत आहे. काही शाळांमध्ये तर भाषा, गणित, विज्ञान यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचे शिक्षक नाहीत.