नागपूर : अनलॉकनंतर एसटीची वाहतूक हळुहळु सुरळीत होत आहे. परंतु अद्याप तेलंगाणा राज्यातील एसटीच्या फेऱ्या सुरू न झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यासाठी बुधवारपासून एसटी महामंडळाने तेलंगाणा राज्यातील हैदराबाद आणि आदिलाबाद येथे बसेस पाठविणे सुरू केल्यामुळे प्रवाशांची सुविधा झाली आहे.
नागपूर तसेच विदर्भातून हैदराबाद आणि आदिलाबाद येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने तेलंगाणा राज्याशी करार करून एसटीच्या फेऱ्या चालू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानुसार एसटीची तेलंगाणा राज्यात वाहतूक सुरू झाली. परंतु लॉकडाऊनमुळे आंतरराज्य फेऱ्या बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यामुळे तेलंगाणा राज्यात जाणाऱ्या एसटी बसेसची वाहतूक बंद झाली होती. अनलॉकच्या प्रक्रियेनंतर पुन्हा तेलंगाणा राज्यातील एसटीच्या फेऱ्या पूर्ववत करण्यात आल्या आहेत. यात हैदराबादला सकाळी ६ वाजता सीटर, सायंकाळी ७.३० वाजता वातानुकूलित शिवशाही आणि आदिलाबादला सकाळी ९ वाजता शिवशाही ही वातानुकूलित बस सोडण्यात येत आहे. या तिन्ही बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून तिन्ही बसेसच्या माध्यमातून एसटीच्या गणेशपेठ आगाराला १ ते १.२५ लाखाचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती गणेशपेठ आगाराचे व्यवस्थापक अनिल आमनेरकर यांनी दिली आहे. लवकरच मध्य प्रदेशात जाणाऱ्या एसटी बसेस सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
................