मॅसिकॉन-२०१५ : ‘रुग्ण व डॉक्टरांसाठी सुरक्षित शस्त्रक्रिया’ परिषदनागपूर : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत असताना रुग्ण व त्याच्या नातेवाईकांशी संवादही तेवढाच महत्त्वाचा आहे. डॉक्टरची जशी रुग्णांना गरज असते, तशीच गरज डॉक्टरांनाही असते. रुग्णांनीही डॉक्टरांचा विचार करायला हवा. डॉक्टर आणि रुग्ण या दोघांमध्ये विश्वास असला पाहिजे. हे क्षेत्र कितीही प्रगत झाले तरी या क्षेत्रात विश्वास, माणुसकी, परस्परांचा विचार, सौजन्य आवश्यक आहे, असे मत डॉ. चिंतामणी यांनी मांडले.शस्त्रक्रिया तज्ज्ञ संघटनेच्या नागपूर शाखेतर्फे रामदासपेठ येथील एका हॉटेलमध्ये ‘रुग्ण व डॉक्टरांसाठी सुरक्षित शस्त्रक्रिया’ या विषयावर ‘मॅसिकॉन-२०१५’ राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या पहिल्या दिवशी ‘शस्त्रक्रिया पलीकडील प्रशिक्षण’ या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले, आजही शस्त्रक्रिया म्हटले की रु ग्णाच्या मनात एक अनामिक भीती उभी राहते. त्याचे नातेवाईक आणि आप्तांच्या मनातही नाना प्रश्न असतात. या प्रश्नांचे निराकरण करणे डॉक्टरांचे कर्तव्य आहे. असे न झाल्यास रुग्ण आणि नातेवाईकांच्या संबंधामध्ये तडे निर्माण होण्याची शक्यता असते. मागील काही वर्षांत याच कारणावरून न्यायालयातील प्रकरणे वाढली आहेत. परिषदेची सुरुवात ‘शस्त्रक्रिया गृहातील टाळता येणारे अपघात’ या विषयावर डॉ. व्ही.एन.श्रीखंडे यांच्या व्याख्यानाने झाली. त्यांनी शस्त्रक्रिया गृहातील चुका टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले. ‘सर्जन आणि रिसर्च’ या विषयावरील आपल्या व्याख्यानात डॉ. जी.व्ही. राव यानी स्तनाच्या कर्करोगावरील शस्त्रक्रियेवर मार्गदर्शन केले. शस्त्रक्रियेनंतर वापरण्यात येणाऱ्या कृत्रिम स्तनाचीही त्यांनी माहिती दिली. दिवसभर चाललेल्या सत्रात विविध विषयांवर डॉ. माधुरी गोरे, डॉ.बी.एस. गेडाम, डॉ. अनिल गावलानी, डॉ. रॉय पाठनकर, डॉ. अपर्णा देशपांडे, डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. काजल मित्रा, डॉ. एम.ए. अख्तर, डॉ. दिलीप गोडे, डॉ. अरविंद कुमार, डॉ. चैत्यानंद कोपीकर यांनी मार्गदर्शन केले.परिषदेचे उद्घाटन उद्या शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता मुंबई उंच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होईल. परिषदेच्या यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष डॉ. रवी गजभिये, सचिव डॉ. ए.एम. कुरेशी, उपाध्यक्ष डॉ. वाय.एस. देशपांडे, डॉ. राजेश सिंगवी, डॉ. ए. सिन्हा, डॉ. विक्रम देसाई, डॉ. प्राची महाजन, डॉ. मुकुंद ठाकूर, डॉ. प्रभात निचकवडे आदी परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)
रुग्णांशी संवाद महत्त्वाचा
By admin | Published: January 30, 2015 12:49 AM