मुंजे चौक : रस्त्यापासून दोन मीटर जागा सोडून बॅरिकेडस् लावणार नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत सीताबर्डी येथील मुंजे चौकात इंटरचेंज मेट्रो स्टेशनच्या (आयकॉनिक टॉवर) बांधकामासाठी एका बाजूचा रस्ता बंद करून बॅरिकेडस् लावण्यात आले आहेत. स्थानिक व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे मुंजे चौकापासून आनंद टॉकीजकडे जाणाऱ्या मार्गावर दोन मीटर जागा सोडून नव्याने बॅरिकेडस् लावण्यात येणार आहे. हे काम १० दिवसात पूर्ण होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे (महामेट्रो) प्रकल्प संचालक महेश कुमार यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.(प्रतिनिधी) दहा महिन्यानंतर हटणार बॅरिकेडस् विस्तृत जागेसाठी व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोरील फूटपाथ हटविण्यात येईल. एक महिन्यानंतर आनंद टॉकीजकडून मुंजे चौकाकडे जाणारा मार्ग बॅरिकेडस्ने बंद करण्यात येईल. या मार्गावरही दोन मीटर रस्ता सोडण्यात येईल. मेट्रोच्या बांधकामासाठी व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन महेश कुमार यांनी केले. याशिवाय सीताबर्डी मुख्य मार्गावर दुहेरी वाहतूक सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासह येथे माहिती आणि मदत केंद्र स्थापन करण्यात येईल. टोल फ्री क्रमांकावरून लोकांना तक्रारीची नोंद करता येईल. मुंजे चौकातील बॅरिकेडस् १० महिन्यानंतर हटविण्यात येणार आहे, तर इंटरचेंज मेट्रो स्टेशनचे बांधकाम दोन वर्षांत पूर्ण होईल. प्रजापतीनगर येथे लवकरच बांधकाम मेट्रो रेल्वेचा टप्पा-४ ची निविदा नुकतीच काढण्यात आली आहे. त्यानुसार एप्रिलमध्ये प्रजापतीनगर येथे मेट्रोचे बांधकाम सुरू होणार आहे. पुढील आठवड्यात कंत्राटदाराला कामाचे पत्र देण्यात येणार आहे. पत्रपरिषदेत महामेट्रोचे उपमहाव्यवस्थापक (जनसंपर्क व समन्वय) शिरीष आपटे, महाव्यवस्थापक (वाहतूक) अरविंद गिरी, अशोक कोकाटे प्रामुख्याने उपस्थित होते. चौथ्या माळ्यावरून मेट्रोच्या वाहतुकीवर लक्ष महेश कुमार म्हणाले, इंटरचेंज मेट्रो स्टेशन (आयकॉनिक टॉवर) ‘एल’ आकाराचे राहील. पहिल्या माळ्यावर (कॉन्कोर्स) मेट्रोचे तिकीट मिळेल. दुसऱ्या माळ्यावर पूर्व-पश्चिम तर तिसऱ्या माळ्यावर उत्तर-दक्षिण कॉरिडोरसाठी प्लॅटफॉर्म आणि चौथ्या माळ्यावर नियंत्रण केंद्र (ओसीसी) कार्यरत राहील. येथून दोन्ही कॉरिडोरच्या मेट्रो रेल्वेचे परिचालन, सिग्नल, वीज, एस्केलेटर, सीसीटीव्ही आदी बारीकसारीक तांत्रिक पैलूंवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. आतापर्यंत १५५० कोटींचा खर्च महामेट्रोचे संचालक (वित्त) एस. शिवमाथन यांनी सांगितले की, ८६८० कोटींच्या या प्रकल्पात आतापर्यंत १५५० कोटी रुपये खर्च झाले आहेत. यात मनपा आणि नासुप्रकडून हस्तांतरित जमिनीच्या किमतीचा समावेश आहे. गेल्यावर्षी ११०० कोटी रुपये खर्च झाले होते. तर वर्ष २०१७-१८ मध्ये २७०० कोटींची आवश्यकता राहील. मनपाकडून ४५० आणि नासुप्रकडून ४५० कोटी रुपये घेणे आहे. झिरो माईल्सवर २० मजली इमारत झिरो माईल्स येथील मेट्रोची इमारत २० माळ्यांची राहील. तसे डिझाईन तयार केले आहे. मंजुरी पाच माळ्याची मिळाली आहे, ही बाब खरी आहे. पण पाच माळ्यानंतरचे डिझाईन स्टीलचे राहील. पाचव्या माळ्यावर प्लॅटफॉर्म राहील. १५ माळे पीपीपी मॉडेलनुसार बनविण्यात येणार आहे. या स्टेशनचे काम सुरू असल्याचे महेश कुमार म्हणाले. इंटरचेंज मेट्रो स्टेशनचे कंत्राट आयएल अॅण्ड एफएस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, हैदराबाद आणि हिंगणा येथील स्टेशन बांधकामाचे कंत्राट आयटीडी कंपनीला दिले आहे. फ्रान्सची इनिया कंपनी दोन्ही कामांचे आर्किटेक्ट आहेत.
दोन वर्षांत पूर्ण होणार इंटरचेंज स्टेशन
By admin | Published: March 18, 2017 3:05 AM