लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जागतिक महिला दिनानिमित्त नागपुरातून सुटणाऱ्या दोन रेल्वेगाड्या गुरुवारी महिला कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहेत. यात नागपूर-भुसावळ इंटरसिटी एक्स्प्रेस आणि मुंबई-नागपूर-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसचा समावेश आहे.नागपूर-भुसावळ इंटरसिटी एक्स्प्रेसला मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘डीआरएम’ बृजेश कुमार गुप्ता ८ मार्चला सकाळी ७.२० वाजता हिरवी झेंडी दाखवून रवाना करतील तर मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसला नागपूर ते गोंदियापर्यंत महिला कर्मचारी चालविणार आहेत. यात दोन्ही रेल्वेगाड्यांचे लोकोपायलट, असिस्टंट लोकोपायलट, गार्ड, तिकीट तपासणी आणि रेल्वे सुरक्षा दल या सर्व महिला राहणार आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त या उपक्रमाव्यतिरिक्त स्थायी रुपाने अजनी रेल्वेस्थानकाचे संचालन महिला कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात येणार आहे. माटुंगा आणि जयपूरच्या गांधीनगर स्टेशननंतर देशातील हे तिसरे रेल्वेस्थानक राहणार आहे, जेथे सर्व महिला काम पाहतील. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमित कुमार अग्रवाल यांच्या निर्देशानुसार इतवारी रेल्वेस्थानकावर ८ मार्चला सकाळी ८ ते दुपारी ४ दरम्यान सर्व कामे महिला कर्मचारी करतील. यात सफाईच्या कामाचाही समावेश आहे. हे काम एका दिवसासाठी महिला सांभाळणार आहेत. गोंदिया रेल्वेस्थानकावरही सॅनिटरी पॅड व्हेंडींग मशीनचे लोकार्पण महिला समाज सेवा समितीच्या अध्यक्ष विधी अग्रवाल यांच्या हस्ते होणार आहे.