आनंद शर्मा
नागपूर : केंद्र शासनाने नव्या वर्षात म्हणजे १ जानेवारीपासून भविष्य निधी खातेधारकांच्या खात्यात मागील वर्षाच्या पीएफच्या व्याजाची रक्कम टाकण्याची घोषणा केली होती; परंतु २२ जानेवारीपर्यंत नागपूर विभागातील अनेक पीएफ खातेधारकांच्या खात्यात व्याजाची रक्कम टाकण्यात आली नसल्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. ‘लोकमत’ने याबाबत माहिती घेतली असता, अजब माहिती पुढे आली. कर्मचारी भविष्य निधी संघटन (ईपीएफओ) आठवड्यातून सात दिवसांऐवजी केवळ आठवड्याच्या अखेरच्या तीन दिवसांपर्यंत खात्यात व्याजाची रक्कम टाकत आहे. यामुळे आतापर्यंत अनेक खात्यात व्याज आलेले नाही.
अधिकाऱ्यांच्या मते पीएफच्या व्याजाची रक्कम केंद्रीय कार्यालयाच्यावतीने पीएफ खात्यात ऑनलाइन जमा करण्यात येत आहे. ही रक्कम मागील वर्षी म्हणजे २०१९-२० ची आहे. पूर्वीही ही रक्कम खात्यात जमा होण्यासाठी नऊ महिने उशीर झाला. आता जानेवारीपासून व्याजाची रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली असताना आठवड्यात केवळ तीन दिवस हे काम करण्यात येत आहे. यामुळे लाखो खात्यात एकाच वेळी व्याजाची रक्कम ऑनलाइन टाकणे शक्य होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व्हरवरील ताण वाढल्यामुळे या कामास उशीर होत आहे. अशा स्थितीत ईपीएफओच्यावतीने आठवड्यातून तीन दिवस म्हणजे शुक्रवारच्या रात्री ८ वाजतापासून सोमवारच्या सकाळी ८ वाजेपर्यंत पीएफ खात्यात व्याजाची रक्कम टाकण्यात येत आहे. कामाचा हाच वेग राहिला तर सर्व पीएफ खातेधारकांच्या खात्यात व्याजाची रक्कम येण्यास बराच कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
............
खातेधारकांना घाबरु नका
‘नागपूर विभागातील पीएफ खातेधारकांनी घाबरण्याची गरज नाही. सर्वांच्या खात्यात पीएफच्या व्याजाची रक्कम टाकण्यात येत आहे. आतापर्यंत विभागातील १६ लाख पीएफ खात्यांपैकी १२ लाख पीएफ खात्यात व्याजाची रक्कम टाकण्यात आली आहे. उर्वरित खात्यात लवकरच व्याजाची रक्कम टाकण्यात येईल.’
-विकास कुमार, प्रादेशिक आयुक्त, भविष्य निर्वाह निधी, ईपीएफओ .
..........