नागपूर : अव्वाच्या सव्वा कमाईच्या प्रलोभनामुळे बी.ई., एम.टेक., सी.ए. यासह विविध उच्च पदवीधारकांनी माथाडी कामगार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, अशी माहिती गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष सादर करण्यात आली.माथाडी कामगारांच्या भरमसाट कमाईसंदर्भात न्यायालयाने स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने वरील माहितीवर आश्चर्य व्यक्त करून माथाडी मंडळासंदर्भात शासनाने पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या आकडेवारीनुसार, एका पोलाद प्रकल्पात लोडिंग-अनलोडिंगसाठी १७८ माथाडी कामगार कार्यरत आहेत. या प्रकल्पात यंत्राच्या साहाय्याने लोडिंग-अनलोडिंग केले जाते. यंत्राने उचलावयाच्या वस्तूला केवळ हूक लटकविण्याचे काम कामगारांना करावे लागते. यासाठी माथाडी मंडळ कंपनीकडून तब्बल ११ कोटी ३० लाख रुपये वसूल करते. येथील माथाडी कामगाराचे मासिक उत्पन्न ५० हजारावर तर, वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांवर आहे. उद्योजकांना याचा फटका बसत आहे याकडेही सुनावणीदरम्यान न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. याप्रकरणात अॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालय मित्र असून मध्यस्थातर्फे अॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
उच्च पदवीधारक माथाडी कामगार होण्यास इच्छुक !
By admin | Published: October 03, 2016 3:00 AM