नागपूर : विविधतेतच खरा रस असतो, तरीदेखील विविधतेचा आपल्याला द्वेष का आहे, असा अनेकदा प्रश्न पडतो. मुळात तणावातून हा द्वेष निर्माण होतो. विविधतेने बुद्धिमान लोक आनंदित होतात व मूर्ख एकमेकांशी लढतात. मानवजीवनात वैविध्यतेचा अंगीकार व्हायलाच हवा. एकत्रित येत असताना भावनांशी समरस झाले पाहिजे. प्रत्येक धर्म, पंथाची स्वत:ची विशेषता आहे. देवालादेखील विविधता आवडते. बौद्ध, जैन, ख्रिश्चन, हिंदू, इस्लाम या धर्मांमध्येदेखील वैविध्य आहे. सर्वधर्मसमभाव व विविधता ही भारताची विशेषताच आहे, अशी भावना ‘दी आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर (shree shree Ravi Shankar) यांनी व्यक्त केली. ( Lokmat National Inter-Religious Conference in Nagpur)
प्रत्येक संप्रदाय जगाचे अनमोल रत्न आहे. सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा सन्मान करायला हवा. विद्वेष निर्माण करण्याचे षडयंत्र काही लोक करतात. मात्र वैविध्यतेतच रस आहे व ईश्वर रसरूपी आहे हे लक्षात ठेवायला हवे. जर व्यक्तीची मागणी जास्त असेल व जबाबदारी घेण्याची भावना नसेल तर दु:ख वाढते. अशी व्यक्ती मनुष्य म्हणवण्यास पात्र नसते. धर्म लोकांना बांधून ठेवतो. पुढील पिढ्या आनंदी, प्रसन्न व्हाव्यात असे सर्वांना वाटते. परंतु प्रार्थनास्थळात गेल्यावर लोक गंभीर होतात. असे व्हायला नको. प्रसन्नता झळकली पाहिजे, कारण तेच धर्माचे लक्षण आहे. अध्यात्म हे मानवऊर्जेशी संबंधित असते व ते लोकांना जोडते. विविध वाद, वैमनस्य यांचे समाधान योग्य मध्यस्थीमुळे होऊ शकते. वादांचे निराकरण करणे हेदेखील धर्माचेच काम आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अन् इराकमधील आठ हजार कुटुंबीय स्वगृही परतली
यावेळी श्री श्री रविशंकर यांनी इराकमधील अनुभव सांगितले. इराकमध्ये तणावाची स्थिती असताना मी राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावर तेथे गेलो होते. इंग्लंडचे पंतप्रधान रेड झोनमध्ये थांबले होते व तेथेच बॉम्बस्फोट झाला होता. मला तेथे कडेकोट सुरक्षाव्यवस्था देण्यात आली होती. परंतु मला रेड झोनमध्ये जायचे होते. तेथे जिद्द करून गेल्यानंतर तेथील लोकांनी माझे स्वागत केले. मी त्यांच्या वेदना जाणून घेतल्या व पहिल्यांदाच आम्हाला कुणी ऐकून घेत आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी विरोधी गटातील आठ हजार कुटुंबीयांची हकालपट्टी केली होती. दुसऱ्या दिवशी मी विरोधी गटातील प्रतिनिधींना रेड झोनमध्ये घेऊन गेलो. अगोदर चर्चेदरम्यान वाद झाले, पण मग ते मध्यस्थीतून शांत झाले. तो इराकसाठी टर्निंग पॉईंट ठरला व आठ हजार कुटुंबीय स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला, असे श्री श्री रविशंकर यांनी सांगितले.