नागपूर : अगोदरच नागपुरात शिवसेना अस्तित्वासाठी संघर्ष करत असताना युवा सेनेमध्ये अंतर्गत वाद वाढले आहेत. स्वातंत्र्यदिवसाच्या कार्यक्रमाला संघटन विस्तारक धरम मिश्रा यांच्या उपस्थितीत नागपुरातील दोन्ही जिल्हाप्रमुखांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. पक्षाने ही बाब गंभीरतेने घेतली असून संघटनेतील वाद शमविण्यासाठी युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई व कार्यकारी सदस्य रुपेश कदम गुरुवारी नागपुरात पोहोचत आहेत.
युवा सेनेच्या स्थापनेपासूनच स्थानिक पदाधिकारी वादात राहिले आहेत. शहरात दोन जिल्हाप्रमुख आहेत. उत्तर,मध्य व पूर्व नागपूरची जबाबदारी विक्रम राठोड यांच्याकडे आहे तर दक्षिण, दक्षिण-पश्चिम व पश्चिम नागपूरचा कार्यभार हितेश यादवकडे आहे. १५ ऑगस्ट रोजी गणेशपेठ स्थित शिवसेना कार्यालयात दोन्ही कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला. वसुली प्रकरणात अडकल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांना पदावर कायम ठेवल्याने प्रश्न उपस्थित करत एकमेकांवर वसुलीचे आरोप लावण्यात आले. याची माहिती मुंबईला पोहोचली व संघटनेने प्रकरण गंभीरतेने घेतले. गुरुवारी रविभवनात बैठक होणार असून सर्वांच्या कामाचा आढावा घेण्यात येईल. कार्यकारिणीत बदल होण्याचादेखील अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.