लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रसिद्ध विनोदी अभिनेता विजय राज यांच्याविरुद्ध गोंदिया येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयामध्ये प्रलंबित विनयभंगाच्या खटल्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी अंतरिम स्थगिती दिली. तसेच, राज्य सरकारला नोटीस बजावून यावर १४ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गेल्या नोव्हेंबरमध्ये एका चित्रपटाच्या शुटिंगसाठी विजय राजसह इतर कलावंत व कर्मचारी गोंदिया येथे आले होते. दरम्यान, ते काही दिवस हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी राज यांनी एका सहकारी तरुणीची छेड काढली असा आरोप आहे. त्या तरुणीच्या तक्रारीवरून ३ नोव्हेंबर रोजी गोंदिया येथील रामनगर पोलिसांनी राज यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तसेच, गुन्ह्याचा तपास पूर्ण करून १२ डिसेंबर रोजी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. संबंधित एफआयआर व खटला रद्द करण्यासाठी राज यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.