नागपूर : मृत महिलेच्या नावावर असलेली कोट्यवधीची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे विकण्यात आली. यासाठी आरोपींनी जमीनमालक मृत महिलेच्या नावाखाली भलत्याच महिलेला दुय्यम निबंधक कार्यालयात हजर केले. १४ मे २०१० ते २० आॅगस्ट २०१० या कालावधीतील घडलेला गैरप्रकार आता उघड झाल्यानंतर सदर पोलिसांनी चंद्रपूरच्या एका टोळीविरुद्ध गुन्हे दाखल केले. विवेक पांडुरंग पडगेलवार (वय ४४, रा़ वडगाव, लक्ष्मीनगर, चंद्रपूर), राहुल राजाराम कांबळे (वय ४५, रा़ उंटखाना, चंद्रपूर), सुनील भाऊराव खोब्रागडे (वय २९, रा. नागसेननगर, भद्रावती), पंकज मेनिनाथ नागदेवते (वय ४०, रा़ बापटनगर, चंद्रपूर) आणि एक महिला प्रमिला नामदेवराव रंगारी यांच्या नावाने अधिकाऱ्यांसमोर हजर झाली) अशी आरोपींची नावे आहेत. विहीरगाव चंद्रपूर येथील प्रमिला नामदेवराव रंगारी यांची मौजा डोंगरगाव येथे जमीन होती. त्यांचा अनेक वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्यांचा मुलगा अविनाश रंगारी (वय ५५) जगन्नाथ बाबानगर चंद्रपूर येथे राहतात. या जमिनीकडे अविनाश यांचे दुर्लक्ष झाले. आरोपींनी त्याचा लाभ उठवत कोट्यवधींच्या या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केली. ती विकण्यासाठी आरोपींनी ग्राहकही शोधला. त्यानंतर प्रमिला रंगारी यांच्या नावाखाली भलत्याच महिलेला निबंधक कार्यालयात हजर करून ही जमीन विकली. हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर अविनाश यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात चकरा मारल्या. (प्रतिनिधी)
मृत महिलेच्या जमिनीची परस्पर विक्री
By admin | Published: April 19, 2015 2:24 AM