लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यवतमाळ येथे होऊ घातलेले ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. अशावेळी एकीकडे यजमान संस्थेद्वारे आयोजनाची तयारी आणि त्यासाठी आवश्यक आर्थिक जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न सुरू असताना याचवेळी आयोजन समितीतील अंतर्गत गटबाजीने अस्वस्थता निर्माण केली आहे. अंतर्गत पडलेले हे गट एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात कामामध्ये ढवळाढवळ करून काही व्यक्ती आणि गटाकडून यजमान संस्था आणि साहित्य महामंडाळवरच दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे संमेलनावर गटबाजीचे सावट निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.मराठी साहित्य संमेलन म्हणजे तमाम महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक समजले जाते. त्यामुळे आयोजनाचे यजमानपद मिळणे आणि त्याचा भाग होणे अभिमानाची बाब मानली जाते. ही संधी दुसऱ्यांदा यवतमाळला मिळाल्याने विदर्भ साहित्य संघाच्या यवतमाळ शाखेसाठी गौरवाची बाब असून तेवढीच ते यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. कोणतेही मोठे आयोजन करताना आर्थिक गरज हा मोठा भाग असतो. यवतमाळ जिल्ह्यात सध्या भीषण दुष्काळाची स्थिती असल्याने आर्थिक गरज भागविण्याचे मोठे यत्न यजमान संस्थेला करावे लागत आहे. अशात ऐक्याने काम करण्याऐवजी गटबाजीतच धन्यता मानणाऱ्यांमुळे संमेलनाच्या प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र आहे.संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महामंडळातर्फे नुकतीच आयोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली. त्या बैठकीनुसार ठरलेली रूपरेखा महामंडळासोबतच्या बैठकीत मांडण्यात आली. यावेळी बैठकीत एका असंतुष्ट गटाने काही नवीन नावे घुसविण्याचा आग्रह धरल्याची माहिती यजमान संस्थेच्या सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. महामंडळाला स्वत:ला कोणतेच नाव एकदा निर्णय झाल्यावर सुचविता येत नसल्याचे नियम सांगून झाल्यावरही या गटाने बैठकीत नाराजी व्यक्त करून बाहेर अकारणच आदळआपट केल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे सदस्यांमधील ही गटबाजी कोणत्या टोकाला जाते, हे दिसून येत आहे. यादरम्यान यापूर्वी संमेलनाध्यक्ष झालेल्या महिला साहित्यिकांच्या साहित्यकृतीचा आढावा घेणाऱ्या एका स्टॉलची व्यवस्था करण्याचे मनोगत यजमान संस्थेने व्यक्त केले. या स्तुत्य उपक्रमावर कुणाकडूनही आक्षेप घेण्याचे कारण नव्हते. मात्र याबाबत विचारणा केली असता महामंडळाला कुठलीही कल्पना नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आयोजन संस्था आणि महामंडळ यांच्यात समन्वयच नसल्याचे चित्र त्यामुळे जाणीवपूर्वक उभे केले जात असल्याचा संशय व्यक्त होतो.वास्तविक संमेलनाध्यक्षाची निवडणूक रद्द केल्याने यातील राजकारण संपले, असे बोलले जात असले तरी आयोजनाच्या ठिकाणचे राजकारण माणसांची गटबाजी संपण्याचे चिन्ह दिसून येत नाही. वर्चस्वाची भावना व एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात यजमान संस्था आणि महामंडळावर दबाव आणून संमेलनच वेठीस धरण्याचा प्रयत्न काही लोक करीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संमेलनावर अंतर्गत कलहाचे सावट निर्माण करण्याच्या मागे कोण कार्यरत आहे, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.स्टॉल नोंदणीला सुरुवातसंमेलनाच्या तयारीबाबत यजमान संस्थेचे कार्याध्यक्ष रमाकांत कोलते यांच्याशी संपर्क केला असता, राज्यभरातून येणाऱ्या पुस्तक विक्रेते व इतर संस्थांची स्टॉल नोंदणी सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय स्मरणिका निर्मितीचे कार्य व पाहुण्यांच्या निवास व्यवस्थेची तयारी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. आर्थिक अडचण नक्कीच आहे आणि यवतमाळसारख्या लहान शहरात निधी संकलन ही मोठी जबाबदारी आहे. मात्र हे संमेलन आपण यशस्वीपणे पार पाडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.