कमलेश वानखेडे
नागपूर : राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणूक निकालांवरून स्वबळ परवडणारे नाही, हे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या लक्षात आले आहे. त्यामुळे नागपूर महापालिकेत तरी दोन्ही काँग्रेसने एकत्र यावे, असा स्थानिक नेत्यांचा प्रयत्न आहे; पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांच्यात गोंदिया-भंडाऱ्यात असलेला अंतर्गत वाद नागपुरातील आघाडीत मुख्य अडथळा ठरण्याचा धोका स्थानिक नेत्यांना वाटत आहे.
राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे ईडीच्या फेऱ्यात अडकल्यानंतर पक्षातर्फे खा. प्रफुल्ल पटेल यांच्यावर नागपूर महापालिकेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पटेल यांनी नागपूरवर लक्ष केंद्रित केले असून नियमितपणे पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेत आहेत.
दुसरीकडे काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे राष्ट्रवादी दुखावली आहे. विदर्भातील राष्ट्रवादीचे एकमेव दुकान बंद पडेल, असे पटोले यांनी केलेले वक्तव्य राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अघाडीसाठी काँग्रेसपुढे नमते घ्यायचे नाही, अशी हायकमांडची सूचना आहे. काँग्रेसचेही स्थानिक नेते व कार्यकर्त्यांना मतविभाजन टाळण्यासाठी राष्ट्रवादीसोबत आघाडी हवी आहे. मात्र, पटोलेंच्या आग्रहापुढे कुणी उघडपणे बोलण्यास तयार नाहीत.
भंडारा जिल्हा परिषदेकडे लक्ष
गेल्यावेळी गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेसने भाजपशी अभद्र युती करीत राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवले होते. भंडाऱ्यात मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येत सत्ता बसविली होती. यावेळी गोंदिया अघाडीच्या हातून गेल्यात जमा आहे. मात्र, भंडाऱ्यात काँग्रेस २१ जागा जिंकून मोठा पक्ष असला तरी सत्तेसाठी राष्ट्रवादीची गरज आहे. पटेल-पटोले यांचे राजकीय संबंध दिवसेंदिवस ताणले जात आहेत. अशात गेल्यावेळचा गोंदियाचा वचपा भंडाऱ्यात काढण्याची भूमिका प्रफुल्ल पटेल यांनी घेतली तर नाना पटोले यांना भारी पटेल. त्यामुळे भंडारा जिल्हा परिषदेत नेमके काय होते, यावर नागपूरचीही सेटलमेंट अवलंबून असल्याचे दोन्ही पक्षातील राजकीय जाणकारांचे मत आहे.
राष्ट्रवादीचा ‘प्लान बी’ तयार
काँग्रेसने स्वबळ ताणून धरले तर शरण न जाण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीने ‘प्लान बी’ तयार केला आहे. नागपुरात आघाडी झाली नाही गेल्या निवडणुकीत पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या ४० जागांवर ताकदीने लढायचे. यातील किमान १० जागा जिंकतील. तर यामुळे काँग्रेसच्या किमान १५ जागा पडतील, अशी तयारी राष्ट्रवादीने सुरू केली आहे.