नागपूर : सोशल मीडियावर विविध प्रकारचे गमतीशीर मीम्स मांजरांचे असतात. मांजरीचे नखरे, मस्ती भारीच असते. मांजरीच्या खोडकर वृत्तीमुळे अनेकदा घरातील वस्तूंचे नुकसान होते; पण त्यांच्या क्युटनेसमुळे आपला रागही तत्काळ शांत होतो. तज्ज्ञांच्या मते मांजरीच्या सहवासात राहणाऱ्या माणसांच्या शरीरात लव्ह हार्मोन्स ॲक्सिटोसीन जास्त मात्रेत असते. अशा व्यक्तींना भावनिक समज जास्त असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पशुकल्याणसाठी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय निधीद्वारे मांजरीच्या संरक्षणासाठी ८ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय मांजर दिवस म्हणून साजरा केला जातो. कुत्र्यानंतर सर्वांत जास्त पाळला जाणारा प्राणी हा मांजरच आहे. त्यामुळे मांजर माणसाळले आहे. नागपुरातच बघा ना १५ हजारांवर कुटुंबात मांजर पोसल्या जात असल्याचा शहरातील पशुतज्ज्ञांचा दावा आहे. यात पर्शियन, मॅक्स, हिमालयीन, जपानी बॉबटेल, ॲबिसिनियन, सयामी, बिर्मन, मेन कून आदी जातीच्या मांजरी आहेत.
- मांजरीची न माहिती असलेली वैशिष्ट्ये
- मांजर १६ ते १८ तास झोप घेते.
- निळ्या डोळ्याची मांजर बहिरी असते.
- मांजर तिच्या उंचीपेक्षा ६ पट उंच उडी घेते.
- मांजरीला गर्भधारणा झाल्यानंतर ६२ दिवसांनी ती ४ ते ६ पिल्लांना जन्म देते.
- तीक्ष्ण नजर, १८० कोनात डोळे फिरतात, अंधारात मांजरीला चांगले दिसते.
- माणसापेक्षा ऐकण्याची क्षमता ५ पटीने जास्त
- मांजरीला टोमॅटो व बटाट्यामुळे अपचन, चॉकलेटमुळे विषबाधा होते.
- गोड टेस्ट मांजरीला समजत नाही.
- मांजर १०० वेगवेगळे आवाज काढते.
- शहरात ५ ते ५० हजार रुपये किमतीपर्यंतच्या मांजरी आहेत. मांजरीच्या सान्निध्यात असणाऱ्या माणसाचे जसे लव्ह हार्मोन्स वाढतात, तसेच आजारही होतात. त्यामुळे मांजरीपासून होणाऱ्या आजारांपासून माणसाचा बचाव करण्यासाठी मांजरीचे लसीकरण करणे गरजेचे आहे.
- डॉ. हेमंत जैन, पशुचिकित्सक