नीलेश देशपांडे
नागपूर : उपराजधानीतील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू मृदुल डेहनकरला अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या भोंगळ कारभाराचा फटका बसला. राष्ट्रीय स्पर्धेचे वेळापत्रक जोडून आल्यामुळे तिला राज्यस्तरीय स्पर्धा मधेच सोडावी लागली.
मृदुलने दोन दिवसांपूर्वी राज्यस्तरीय वरिष्ठ महिला ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. त्यासाठी तिला १० हजार रुपयाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर तिने २० वर्षांखालील गटातही धमाकेदार सुरुवात करून पहिल्या चार फेऱ्यांमध्ये विजय मिळवला. त्यानंतर तिला महासंघाच्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ही स्पर्धा मधेच सोडावी लागली. ती या स्पर्धेच्या विजेतेपदाची ठोस दावेदार होती.
राष्ट्रीय स्पर्धेला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा येत्या रविवारी संपणार आहे. मृदुलने या स्पर्धेतील पहिल्या सहा फेऱ्यांमध्ये चांगली कामगिरी करून ४ गुण मिळवले आहेत. तिने पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये अनुक्रमे बिहारच्या एैबा उल्लाह, ओडिशाच्या स्मारकी मोहांटी व आंध्र प्रदेशच्या जी. संध्या यांचा पराभव केला. चौथ्या फेरीत तिला तामिळनाडूच्या पी. व्ही. निधीकडून पराभव स्वीकारावा लागला. पाचवी फेरी तिने पश्चिम बंगालच्या समृद्धी घोषला हरवून जिंकली तर, सहाव्या फेरीत तिचा केरळच्या निम्मी एजी हिने पराभव केला. स्पर्धांचा कार्यक्रम जोडून आल्याबद्दल राज्य संघटनेचे सचिव धनंजय गोडबोले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ऑनलाईन स्पर्धेचे वेळापत्रक अतिशय व्यस्त असल्यामुळे याविषयी काही करू शकत नसल्याची प्रतिक्रिया दिली.
--------------
स्पर्धा सोडल्याची खंत नाही
मृदुलच्या पालकांनी लोकमतशी बोलताना मृदुलला राज्यस्तरीय स्पर्धा मधेच सोडल्याची खंत नसल्याचे सांगितले. दोन्ही संघटनांना नाईलाजास्तव असे वेळापत्रक तयार करावे लागले. त्याबाबत काहीच तक्रार नाही असेही ते म्हणाले. मृदुल २६ जुलैपासून सुरु होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनियर स्पर्धेतही खेळणार आहे.