राकेश घानोडे
नागपूर : केंद्रीय गुन्हे अहवालानुसार, २०१८ ते २०२० या कालावधीत राज्यामध्ये दरवर्षी बलात्काराचे सरासरी २ हजार १६७ गुन्हे दाखल करण्यात आले. जगामध्ये आज लैंगिक हिंसाचार निर्मूलन दिवस साजरा केला जात आहे. परंतु हे चित्र पाहता, राज्यात लैंगिक हिंसाचाराचे निर्मूलन कसे होईल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
लैंगिक हिंसाचारात मोडणाऱ्या इतर गुन्ह्यांच्या बाबतीतही राज्यात अशीच धक्कादायक परिस्थिती आहे. समान कालावधीत विनयभंगाचे दरवर्षी सरासरी तब्बल १० हजार ४२४ गुन्हे दाखल झाले आहेत. महिलेचा बलात्कार करून खून करण्याचे १७, महिलेला कळेल अशा पद्धतीने अश्लील कृती करण्याचे १ हजार ३९, तर पाॅक्सो कायद्यांतर्गत ६ हजार ३५ गुन्हे दाखल करण्यात आले.
वर्षनिहाय गुन्हे (अनुक्रमे २०१८ ते २०२०)
महिलेचा बलात्कार करून खून : १७ - १५ - २०
बलात्कार : २,१४२ - २,२९९ - २,०६१
विनयभंग - १०,८३५ - १०,४७२ - ९,९६५
अश्लील कृती करणे - १,०७४ - १,०७४ - ९६९
बलात्काराचा प्रयत्न - ४ - ४ - ३
पॉक्सो - ६,१३५ - ६,४०२ - ५,५७०
संयुक्त राष्ट्र संघाने निश्चित केला दिवस
जगभरातील संघर्षग्रस्त परिस्थितीमध्ये लैंगिक हिंसाचारामुळे मृत्यू झालेल्या पीडितांना श्रद्धांजली अर्पण करणे आणि लैंगिक हिंसाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जगाला एकत्र आणणे, याकरिता २०१५ साली संयुक्त राष्ट्र संघाने १९ जून रोजी आंतरराष्ट्रीय लैंगिक हिंसाचार निर्मूलन दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो.
- आभा पांडे, सदस्य, राज्य महिला आयोग