नागपूर : शरीर निरोगी राहण्यासाठी योगाचे महत्त्व आहे. मी कितीही व्यस्ततेत दररोज सकाळी दोन तास प्राणायाम आणि योगासन करीत असतो. नियमित योग केल्याने औषधांची गरज भासत नाही. त्यामुळे तुम्हीही नियमित योग करा असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
नागपूर महापालिका व नागपूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामूहिक योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गडकरींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेच्या सीईओ सोम्या शर्मा, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे खांडवे गुरुजी, आमदार टेकचंद सावरकर, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना खांडवे गुरुजी म्हणाले की शरीराची व्याधी मानसिक बिमारी दूर करायची असेल तर नियमित योग केला पाहिजे. जसे कुटुंब सुदृढ ठेवण्यासाठी गृहिणीने योग करावा, तसाच सामाजिक स्वास्थ सुधारण्यासाठी सांघिक योग करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमात गडकरी यांनी उपस्थितांसोबत योग आणि प्राणायाम केले.