वसीम कुरैशी
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ गेल्या दीड वर्षापासून केवळ नावालाच आंतरराष्ट्रीय राहिला आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे विदेशी विमानांच्या उड्डाणांवर अजूनही प्रतिबंध आहेत. नागपुरातून दोहाकरिता कतार एअरवेज आणि शारजाहकरिता एअर अरेबियाची उड्डाणे होती. या दोन्ही उड्डाणांच्या माध्यमातून वर्षभरात नागपूर विमानतळाला यूजर डेव्हलपमेंट फीच्या (यूडीएफ) स्वरूपात जवळपास ५० लाख रुपये मिळायचे, पण ही उड्डाणे बंद असल्यामुळे व्यवस्थापनाचे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
कोरोनामुळे कतार एअरवेजने नागपुरातून संचालन बंद केले. तर एअर अरेबिया संचालन केव्हा सुरू करेल, यावर स्पष्टता नाही. नागपूर विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवाशाकडून १५० रुपये तर घरगुती उड्डाणाच्या प्रवाशाकडून ३५० रुपये यूडीएफ वसूल करण्यात येतो. कोरोनाकाळात अनेक महिने घरगुती उड्डाणेसुद्धा बंद होती. या कारणाने घरगुती उड्डाणाच्या प्रवाशांकडून मिळणाऱ्या कोट्यवधींच्या यूडीएफचेही नुकसान झाले आहे. गेल्या दहा वर्षांपासून विमानतळाच्या विकासासाठी खासगी भागीदाराची वाट पाहत असलेल्या मिहान इंडिया लिमिटेडला पुढे (एमआयएल) टर्मिनल बिल्डिंगच्या आत आवश्यक विकासकामे करण्याचे आव्हानच आहे. महसूल गोळा करण्यासाठी नवीन उपाय म्हणून आतील दुकानांच्या जागेत बदल करताना काही दुकाने रिक्त केली. आता येथील नवीन दुकानांसाठी निविदा काढण्यात येणार आहे.
हिवाळ्यात उड्डाणे वाढण्याची अपेक्षा
सध्या नागपूर विमानतळावरून ८५ टक्के उड्डाणांच्या संचालनाची परवानगी आहे. अर्थात अजूनही १५ टक्के घरगुती विमानाच्या प्रवाशांकडून यूडीएफ मिळत नाही. हिवाळ्यात तीन नवीन उड्डाणे सुरू होण्याची अपेक्षा आहे. भविष्यात विमानतळाच्या आत नवीन दुकाने सुरू होतील. त्यानंतर महसूल पूर्वीसारखाच मिळू शकेल, असे सूत्रांनी सांगितले.