नागपूर : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या मान्यतेने १ जूनपासून दुसऱ्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोराडी मार्गावरील नैवेद्यम नॉर्थस्टार सभागृहात ९ जूनपर्यंत होणाऱ्या स्पर्धेत १५ देशांतील बुद्धिबळपटू सहभागी होणार आहे. ही स्पर्धा चार गटात होणार आहे.
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री डॉ. परिणय फुके व उपाध्यक्ष ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे यांनी पत्रकार परिषदेत स्पर्धेबाबत माहिती दिली. नागपुरात प्रथमच ही स्पर्धा हाेत आहे. महाराष्ट्र चॅलेंजर स्पर्धा चार ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळपटूंमध्ये होणार आहे. १ ते ६ जूनदरम्यान रशियातील ग्रॅण्डमास्टर पीटर स्विडलर व नाशिकचा ग्रॅण्डमास्टर विदित गुजराथी आणि युनायटेड किंगडमचा ग्रॅण्डमास्टर निजेल शॉर्ट व नागपूरचा १३ वर्षांत ग्रॅण्डमास्टर होणाऱ्या रौनक साधवानी यांच्यामध्ये लढत हाेईल. विशेष म्हणजे चारही ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळपटू क्लासिकल, रॅपिड व ब्लिट्ज या तिन्ही प्रकारात खेळणार आहेत.
दुसऱ्या प्रकारात २००० व त्यापेक्षा अधिक फिडे रेटिंग असलेल्या बुद्धिबळपटूंची महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर स्पर्धा १ ते ९ जूनदरम्यान होणार आहे. या प्रकारात १५ देशांतील १३४ बुद्धिबळपटूंनी प्रवेश निश्चित केला आहे. त्यामध्ये १६ ग्रॅण्डमास्टर, एक महिला ग्रॅण्डमास्टर, सहा महिला इंटरनॅशनल मास्टर आणि २० इंटरनॅशनल मास्टरचा समावेश आहे. या मुख्य स्पर्धेत रशियाचा ग्रॅण्डमास्टर बोरिस सावचेन्कोला अग्रमानांकन, तर ग्रॅण्डमास्टर व्हायाचेस्लाव झाखार्त्सोव्ह यास दुसरे मानांकन देण्यात आले आहे.
या स्पर्धेत भारताच्या विविध राज्यांतील २८५ बुद्धिबळपटूंनी प्रवेश निश्चित केला आहे. १६०० पेक्षा कमी फिडे रेटिंग असलेल्या बुद्धिबळपटूंची स्पर्धा ६ ते ९ जूनदरम्यान होणार आहे. या गटात भारत देशासह बांगलादेश, श्रीलंका, युएसए व इंग्लंड येथील १३१ बुद्धिबळपटूंनी प्रवेश निश्चित केला आहे. पत्रकार परिषदेत महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले, ग्रॅण्डमास्टर पीटर स्विडलर, विदित गुजराथी, निजेल शॉर्ट रौनक साधवानी, आयोजन समितीचे ॲड. निशांत गांधी, भूषण श्रीवास, एस. एस. सोमण उपस्थित होते.