योगेश पांडे/ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 3 : सामान्य कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचे असेल तर दुर्दम्य आत्मविश्वासासोबतच कठोर मेहनत करण्याची तयारीदेखील आवश्यक असते. स्वत:मधील न्यूनगंड बाजूला सारून जर प्रयत्न केले तर केलेली मेहनत सत्कारणीच लागते. ‘ब्युटी विथ ब्रेन’ असलेल्या लोपामुद्रा राऊतने याच गुणांच्या बळावर आंतरराष्ट्रीय ‘फॅशन’ जगतात झेंडा रोवला आहे. ‘मिस युनायटेड कॉन्टिनेन्ट’ या स्पर्धेत तिसरं स्थान पटकावून हजारो तरुणींसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
इक्वाडोर या देशात आयोजित या स्पर्धेत विविध ३८ देशांच्या स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत लोपामुद्राने सातत्यपूर्ण कामगिरी केली. अनेक अडथळ्यांवर मात करत तीने या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिसरं स्थान पटकावलं. सोमवारी तिचे नागपुरात आगमन झाले.
२०१३ साली ‘मिस इंडिया’ स्पर्धेच्या अंतिम २३ स्पर्धकांत तिची निवड झाली व तिथे तिने मोठमोठ्या शहरांतील तरुणींना मागे सारत तिसरा क्रमांक पटकाविला होता. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने विविध सौंदर्यस्पर्धांत स्वत:ची छाप पाडली अन् ‘मिस युनायटेड कॉन्टिनेन्ट’ या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची तिला संधी मिळाली. इतकी मोठी मजल गाठल्यानंतरदेखील तिचे पाय मात्र जमिनीवरच आहेत. म्हणूनच की काय नागपुरात परत आल्यानंतर आईकडे तिने हक्काची फर्माईश केली ती पुरणपोळी आणि कढी या अस्सल मराठमोळ्या पदार्थांची.