नामवंत कलावंतांची हजेरी : वसंतराव देशपांडे स्मृतिनिमित्त आयोजननागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने सुप्रसिद्ध गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिनिमित्त आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन ३० जुलै ते ३ आॅगस्ट दरम्यान वसंतराव देशपांडे सभागृहात सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे, अशी माहिती दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे निर्देशक पीयूष कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. महोत्सवात ३० जुलैला जर्मनीचा कलावंत कार्टसन वीके यांचे धृपद शैलीत रुद्रवीणा वादन, पं. एम. व्यंकटेशकुमार यांचे शास्त्रीय गायन, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्हायोलिन वादक पद्मभूषण डॉ. एल. सुब्रमणीयम यांचे कर्नाटक शैलीत वादन होईल. ३१ जुलैला जपान येथील ताकाहिरो अराई यांचे संतूर वादन, सुप्रसिद्ध बासरीवादक पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरीवादन होईल. त्यांना तबल्यावर पद्मश्री पं. विजय घाटे, पखवाजवर पं. भवानी शंकर साथसंगत करतील. त्यानंतर नृत्यांगना शमा भाटे यांचे डॉ. वसंतराव यांच्या बंदिशीवर कथ्थक नृत्य होईल. १ आॅगस्टला डॉ. वसंतराव देशपांडे संगीत स्पर्धेचे मागील वर्षाचे विजेता नागनाथ अडगावकर यांचे शास्त्रीय गायन, नागपूर येथील रहिवासी रोशन लाल यांचे एकल तबला वादन, मुंबई साहित्य संघातर्फे निर्मित आचार्य अत्रे लिखित संत सखुबाई यांच्या जीवनावरील ‘संगीत प्रीतीसंगम’ नाटक होईल. २ आॅगस्टला वसंतराव देशपांडे संगीत स्पर्धेतील विजेती दीप्ती नामजोशी यांचे शास्त्रीय गायन, पद्मश्री डॉ. कद्री गोपालनाथ (सेक्सोफोन), पं. प्रवीण गोडखिंडी (बासरी) यांची जुगलबंदी होईल. याशिवाय जगप्रसिद्ध शास्त्रीय गायक पद्मश्री उस्ताद रशिद खान यांचे गायन होईल. ३ आॅगस्टला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार कलाईममणी शिवमणी आण रुना रिजवी-शिवमणी यांची ‘न्यू लाईफ’ फोक फ्यूजन संगीत सभा होईल. त्यानंतर प्रतिभावंत गायक राहुल देशपांडे यांचे गायन होईल. संगीत सभेचा समारोप आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत उस्ताद पद्मविभूषण अमजद अली खान यांच्या सरोद वादनाने होईल. समारोहादरम्यान वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र आणि पोट्रेट रांगोळी प्रदर्शन स्मृती वसंतचे आयोजन केंद्राच्या राजा रविवर्मा आर्ट गॅलरीत ३० जुलै ते ३ आॅगस्टदरम्यान सकाळी ११ ते रात्री १० दरम्यान करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सव नागपुरात
By admin | Published: July 26, 2016 2:28 AM