योगेंद्र शंभरकर
नागपूर : वाघांची राजधानी म्हणून देशभरात प्रसिद्ध असलेल्या नागपूरसह विदर्भातील जंगलात तस्करांचे जाळे पसरले आहे. राष्ट्रीय महामार्गाशी जुळले असल्याने विदर्भ आणि नागपूर जिल्हा नेहमीच वन्यजीव शिकाऱ्यांच्या निशान्यावर राहिला आहे.
वर्षभरापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने केलेल्या मोहिमांवर नजर टाकली असता येथील शिकाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी केलेले प्रयत्नही दिसतात. २९ जुलै २०२१ रोजी नागपूर वन विभाग (प्रादेशिक)च्या वतीने स्पेशल अँटी स्मगलिंग स्क्वॉडची स्थापना केली होती. स्थापनेच्याच दिवशी एका खबऱ्याच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील बिछवासाहनी येथे सापळा रचून बिबट्याचे चामडे, पंजे आणि नखांसह चार आरोपींना अटक करण्यात आली होती. यानंतर खबऱ्यांच्या मध्यमातून १२ महिन्यांत २२ सापळे रचून या पथकाने ११७ आरोपींना अटक केली आहे.
दहा वर्षांपूर्वीच बहेलिया टोळी लागली होती हातात
देशभरात कटनी (म. प्र.) येथील बहेलिया टोळ चर्चेत आहे. नागपूर ते चंद्रपूरदरम्यान जडी-बुटीच्या व्यवसायाआड ही टोळी वनक्षेत्रात शिकार करत असे. पहिल्यांदा २०१२ मध्ये या टोळीतील ११ आरोपींना अटक करण्यात आली होती. या तपासादरम्यान २०१३ पर्यंत पुन्हा ३५ आरोपी हातात लागले. पुढे वाघांच्या शिकार प्रकरणात हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता.
शिकार विरोधी पथक यापूर्वीही
शिकारींच्या घटना रोखण्यासाठी वनक्षेत्रात शिकार प्रतिबंधक पथक आणि मोबाईल स्क्वॉड गस्त घालतात. शिकार प्रतिबंधक पथक फक्त हरीण, पोपट आणि सशांच्या शिवारीपुरतेच मर्यादित होते. अखेर नागपूर वन विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांनी पुढाकार घेऊन एसीएफ नरेंद्र चांदेवार, आरएफओ लहू ठोकळ यांच्या नेतृत्वात स्पेशल अँटी स्मगलिंग स्क्वॉड उभारले.
तस्करांवरील कारवाई
वन्यजीव- कारण - एकूण छापे -अटकेतील आरोपी
वाघ -अवयव तस्करी - १० - ५४
बिबट- शिकार - ५ - ३१
खवले मांजर-अवयव आणि जिवंत- ३ - १५
कासव - जिवंत - १ - ३
अन्य - अवयव तस्करी - ३ - १४