नागपूर : विश्वशांती व मानवकल्याणासाठी येत्या १ नाेव्हेंबर रोजी दीक्षाभूमीवर आंतरराष्ट्रीय त्रिपिटक संगायन आयोजित करण्यात आले आहे. भारतासह म्यानमार, थायलंड, कंबोडिया, श्रीलंका आदी देशांतील शंभरावर बौद्ध भिक्खू सहभागी होऊन बुद्धवचनांचे उद्घोषण करतील.
आंतरराष्ट्रीय त्रिपिटक संगायन परिषद आणि लाइट ऑफ बुद्ध धर्म फाउंडेशन इंटरनॅशनल यांच्या संयुुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी, आवाज इंडिया टीव्ही, नागपूर बुद्धिस्ट असोसिएशन आदी संघटनांच्या वतीने या त्रिपिटक संगायनचे आयोजन करण्यात आले आहे. दीक्षाभूमीवरील मध्यवर्ती स्तूपात हे संगायन होईल. सकाळी ७.३० वाजता स्तूपाला परिक्रमा करून धम्म रॅलीला सुरुवात होईल. ८.३० वाजता उद्घाटन होईल. इंटरनॅशनल त्रिपिटक चॅटिंग काउंसिलचे संयोजक वांग्मो डिक्सी हे मुख्य अतिथी राहतील. स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई अध्यक्षस्थानी राहतील. तर सचिव डॉ. सुधीर फुलझेले हे अतिथी राहतील. सकाळी ९ वन्तापासून संगायनला सुरुवात होईल. तत्पूर्वी ३१ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाईल.