आनंद डेकाटे,नागपूर : जागतिक योग दिनानिमित्त महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने यशवंत स्टेडियम येथे सामूहिक योगाभ्यासाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात हजारो योग साधकांसह सर्वसामान्य नागरिकही सहभागी झाले होते.
या सामुहिक योगाभ्यासात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह आ. टेकचंद सावरकर, आ. कृष्णा खोपडे,मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अतिरिक्त आयुक्त अजय चारठानकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे प्रमुख रामभाऊ खांडवे, प्रसिद्ध आहारतज्ज्ञ जगन्नाथ दीक्षित यांच्यासह मोठ्या संख्येने योग अभ्यासक, युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक, एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रारंभी शालेय विद्यार्थ्यांनी योगासनाची लक्षवेधक सामूहिक प्रात्यक्षिके सादर केली. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे प्रमुख रामभाऊ खांडवे यांनी निरोगी जीवनासाठी योगाचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्व विशद केले. संचालन महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी तर आभार क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर यांनी मानले.
क्रीडापट्टूंचा सन्मान-
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविणाऱ्या जिल्ह्यातील क्रीडापटूंचा यावेळी सन्मान करण्यात आला. वैभव श्रीरामे , हर्षल चुटे,छकुली सेलोकर, तेजस्विनी खिंची, यज्ञेश वानखेडे, खुश इंगोले, वैभव देशमुख, रचना आंबुलकर, अलिशा गायमुखे, ओम राखडे, प्रणय कंगाले,श्रावणी राखुंडे, निसर्गा भगत,मृणाली बानाईत, श्रीराम सुकसांडे या जिल्ह्यातील क्रीडापटूंना केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.शारीरिक व मानसिक सुदृढतेसाठी योग आवश्यक : गडकरी
मानवी जीवनात योगासनाचे अनन्यसाधारण महत्व आहे. निरोगी व आनंददायी जीवन जगण्यासाठी तसेच शारीरिक व मानसिक सुदृढ आरोग्यासाठी नियमितपणे योगसाधना करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले.