रेवराल : पेंच प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या निमखेडा योजनेच्या डाव्या कालव्याला भेगा पडलेल्या आहेत. भंडाराकडे जाणारा हा कालवा सुमारे पाच महिन्यापासून नादुरुस्त असल्याने कालव्याला पाणी सोडण्यात आले नाही. पाण्याची सुविधाच नसल्याने परिसरातील धान रोवणी थांबली आहे. भंडाराकडे जाणारा हा कालवा आहे. या संपूर्ण प्रकारामुळे हजारो एकर पीक संकटात सापडले असून तातडीने उपाययोजना करण्यात न आल्यास हजारो एकर शेतीवर संकट कोसळण्याची भीती वर्तविली जात आहे.
रामटेक पेंच पाटबंधारे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाच महिन्यापूर्वी सदर समस्या मांडण्यात आली. अधिकाऱ्यांनी या समस्येकडे कानाडोळा केला. अखेरीस शेतकऱ्यांना धान रोवणीची कामे थांबवावी लागली. एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे धान उत्पादकांसमोर पेच निर्माण झाला असताना दुसरीकडे हाकेच्या अंतरावर पाणी असूनही उपयोगाचे नाही, अशी दयनीय अवस्था आहे. शेतालाच लागून कालवा असून अन्य साधन शेतकऱ्याकडे उपलब्ध नाही. शिवाय धान रोवणीला मुबलक पाणी लागते. या संपूर्ण प्रकारामुळे शेतकरी चिंतेत अडकले आहेत. प्रस्तूत प्रतिनिधीने रामटेक पेंच पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला असता, कालव्याची दुरूस्ती लवकरच करणार असल्याचे सांगितले.
---
शेतमजुरांवरही संकट
मौदा तालुक्यात धान पट्टा मोठा आहे. अशावेळी बहुतांश शेतमजूर लगतच्याच भंडारा जिल्ह्यातून येत असतात. आता कालव्याचे पाणीच बंद असल्याने शेतमजुरांवर सुद्धा घरीच राहण्याची वेळ आलेली आहे. फुटलेल्या कालव्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी आणि पाणी सोडण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी जोर धरत आहे.
-
कालव्याचे काम २४ जुलैपासून सुरू केले. २६ जुलैपासून पाऊस अधिक झाल्याने कामात अडथळा निर्माण झालेला आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करू आणि पाणी सोडू.
राजू बोंबले, उपविभागीय अधिकारी
पेंच पाटबंधारे विभाग रामटेक
----
पेंच प्रकल्प अधिकाऱ्यांना मार्च महिन्यापूर्वीच ही समस्या सांगितली. अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्यांच्या दुर्लक्षितपणामुळेच हजारो एकर शेती संकटात सापडली आहे. आधीच दुरुस्तीचे काम झाले असते, तर ही वेळ शेतकऱ्यांवर आली नसती.
सुरेश सज्जा
शेतकरी, खापरखेडा
280721\3202img-20210726-wa0021.jpg
पाण्याविना हजारो एकर जमीन संकटात फोटो