लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : एटीएम फाेडून त्यातील रक्कम लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टाेळीला अटक करण्यात कामठी (नवीन) पाेलिसांना यश आले. या चाेरट्यांकडून एकूण ४ लाख ७८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती ठाणेदार विजय मालचे यांनी दिली. ही कारवाई गुरुवारी (दि. ८) मध्यरात्री कामठी-घाेरपड मार्गावरील रामगड परिसरात करण्यात आली.
दीपेंद्र प्रताप ईश्वरदीन (२०), आशुतोष वेदप्रकाश कालपी, दोघेही रा. देवकली, मैनपूर, जिल्हा जालाैन (उत्तर प्रदेश), गौतम राजाराम (२६, रा. दौतपूर, जिल्हा कानपूर, उत्तर प्रदेश) व दीपू मुन्नालाल यादव (२३, रा. शेवडी, जिल्हा मोहबा, उत्तर प्रदेश), अशी अटक करण्यात आलेल्या आराेपी दराेडेखाेरांची नावे आहेत.
कामठी (नवीन) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना रामगड परिसरात यूपी-७७/पी-०८६४ क्रमांकाची बाेलेराे आढळून आली. संशय आल्याने त्यांनी ही बाेलेराे थांबवून आतील व्यक्तींची चाैकशीत करीत वाहनाची झडती घेतली. बाेलेराेमध्ये त्यांना मोठी हातोडी, दोन कटर, दोन मोठे पेचकस, लोखंडी हेक्सा आदी साहित्य आढळून आले. चाैकशीदरम्यान ते असंबद्ध उत्तरे देत असल्याचे तसेच एटीएम फाेडण्याच्या तयारीत कुठेतरी जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पाेलिसांनी चाैघांनाही ताब्यात घेत त्यांच्याकडील बाेलेराे व इतर साहित्य जप्त केले.
या कारवाईमध्ये आराेपींकडून वेगवेगळ्या बँकेचे ६० एटीएम कार्ड, दोन मोबाईल, बोलेरो व इतर साहित्य असा एकूण ४ लाख ७८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी भादंवि ३९९ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही कामगिरी दुय्यम पोलीस निरीक्षक मंगेश काळे, उपनिरीक्षक विजय कार्वेकर, रवी बड, अलोक रावत, राष्ट्रपाल दुपारे, उमेश पडोळे, अविनाश चांगोले यांच्या पथकाने केली.
...
सात दिवसाची पाेलीस काेठडी
अटक करण्यात आलेल्या चारही आराेपींना पाेलिसांनी शुक्रवारी (दि. ९) कामठी शहरातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. आर. भोला यांच्या न्यायालयासमाेर हजर केले हाेते. न्यायालयाने त्यांना सात दिवसाची म्हणजेच गुरुवार(दि. १५)पर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे, अशी माहिती ठाणेदार विजय मालचे यांनी दिली. या टाेळीतील अन्य सदस्यांना अटक करण्यात येणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत, त्यांच्याकडून चाेरी व दराेड्याच्या काही घटना उघड हाेण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.