लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे एसटी महामंडळात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर एका गाडीत केवळ २२ प्रवासी बसवून वाहतूक सुरू करण्यात आली. नागपूर तसेच विदर्भातून परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटीने आंतरराज्यीय बससेवा सुरु केली आहे. या बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून एका बसमध्ये ४५ प्रवासी प्रवास करीत आहेत.
एसटी महामंडळात कोरोनामुळे सहा महिने लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर एसटीने नागपूर जिल्ह्यात वाहतूक सुरू केली. टप्प्याटप्प्याने बसेसची संख्या वाढविण्यात आली. आता नागपुरातून आंतरराज्यीय बस फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. नागपूर तसेच विदर्भातून परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. आंतरराज्यीय बस फेऱ्या बंद असल्यामुळे त्यांची गैरसोय होत होती. आता एसटीने आंतरराज्यीय बस फेऱ्या सुरू केल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. आंतरराज्यीय बसेसला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यानी दिली आहे.
नागपूर जिल्ह्यातून धावतात १५ बसेस
आंतरराज्यीय बस फेऱ्या सुरु केल्यानंतर प्रवाशांनी या बसेसला चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे बसेसची संख्या वाढविण्यात आली असून सध्या नागपूर जिल्ह्यातून १५ आंतरराज्यीय बसेस चालविण्यात येत आहेत. या बसेसमुळे परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांची सुविधा झाली आहे. रेल्वेत आरक्षण फुल्ल असल्यामुळे हे प्रवासी आता एसटी महामंडळाच्या आंतरराज्यीय बसेसकडे वळल्याचे चित्र आहे.
इतर राज्यातून येतात पाच बसेस
इतर राज्यातूनही विदर्भात आंतरराज्यीय बसेस सुरु करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आंध्र प्रदेशातील आदिलाबाद आगारातून तीन बसेस नागपूरला येतात. तर हैदराबाद येथून दोन बसेस येत आहेत. आंध्र प्रदेशातून एकूण पाच बसेस नागपुरात येत आहेत.
कुठे-कुठे जातात बसेस
नागपुरातून छत्तीसगड राज्यात रायपूर आणि राजनांदगाव, मध्य प्रदेशात छिंदवाडा, बेरडी, खमारपाणी, रामाकोना, बिछवा, लोधीखेडा, मोहगाव येथे बसेस सोडण्यात येत आहेत. आंध्र प्रदेशात हैदराबादला आणि आदिलाबादला बसेस सोडण्यात येत आहेत. रेल्वेगाड्या प्रत्येक ठिकाणी थांबत नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. आता एसटीच्या परराज्यात जाणाऱ्या बसेस सुरु झाल्यामुळे प्रवाशांची सुविधा झाली आहे.
बसेसला मिळतोय प्रतिसाद
एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने परराज्यात बसेस चालविण्यास सुरुवात केल्यानंतर पहिल्याच दिवसापासून या बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लॉकडाऊननंतर एसटी महामंडळाने एका बसमध्ये २२ प्रवासी बसवून वाहतूक सुरू केली होती. त्यानंतर पूर्ण क्षमतेने बसेसमध्ये प्रवासी वाहतूक सुरू झाली. आता आंतरराज्यीय बस फेऱ्या सुरू केल्यानंतर एका गाडीत ४५ प्रवासी मिळत आहेत.
आंतरराज्यीय बसेसला प्रवाशांचा प्रतिसाद
‘आंतरराज्यीय बसफेऱ्या सुरू केल्यानंतर एसटी बसेसला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यात जाणाऱ्या बसेसमध्ये प्रवासी गर्दी करीत आहेत. या बसेसचे प्रवासी भारमान चांगले असून प्रवाशांचा प्रतिसाद आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.’
-अनिल आमनेरकर, आगार व्यवस्थापक, गणेशपेठ आगार
................