लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ठिकठिकाणचे मोबाईल चोरून ते झारखंड मार्गे बांगलादेशात पाठविणाऱ्या मोबाईल चोरट्याची आंतरराज्यीय टोळी धंतोली पोलिसांनी जेरबंद केली. या टोळीतील सात आरोपींना पोलिसांनी अटक केली तर, सूत्रधारासह दोघे फरार झाले. टोळीत १० आणि १२ वर्षांच्या दोन बालकांचाही समावेश आहे, हे विशेष !आफताब ईबरार अन्सारी (वय १९, रा. भागलपूर, बिहार), अमरजीतकुमार गंगा महतो (वय १९), विशालकुमार गंगा महतो (वय २०), धर्मेंद्रकुमार बिहारी मंडल (वय १९), भोला बोधन महतो (वय २२), आस्तिक अनिल घोष (वय २०) आणि नंदकुमार उपेंद्र चौधरी (वय २०, सर्व रा. झारखंड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचे ७ मोबाईल जप्त केले. या टोळीचा सूत्रधार अमरजीत कुमार मंडल असून तो आणि त्याचा एक साथीदार मात्र पोलिसांच्या कारवाईनंतर नागपुरातून पळून गेला.अमरजीत मंडल आणि त्याच्या टोळीतील गुन्हेगार ठिकठिकाणी भाड्याने खोली घेऊन राहतात. उपरोक्त चोरट्यातील काही जण जोगीनगरात आणि काही जण ओंकार नगरात भाड्याने राहत होते. गर्दीची ठिकाणे किंवा आठवडी बाजारात शिरून ही टोळी बेमालूमपणे मोबाईल चोरतात. मोबाईल चोरल्यानंतर तो अल्पवयीन साथीदारांकडे दिला जातो. आठवडाभरात चोरलेले मोबाईल आणि झारखंडला आणि नंतर बांगलादेशला पाठविले जातात.गणेशचतुर्थी निमित्त मोठ्या प्रमाणात हार फुलांची मागणी होते. त्यामुळे सावनेर येथील विक्रांत चलपे १ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता धंतोलीतील नेताजी फुल मार्केटमध्ये फुल घ्यायला आले होते. संधी साधून आफताब अन्सारीने चपलेच्या खिशातील १५ हजारांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्कतेमुळे अन्सारीला चपलेने रंगेहात पकडले. यावेळी बाजारात मोठी गर्दी होती. गोंधळ उडाल्याने पोलीसही पोहचले. पोलिसांनी आफताफ अन्सारीची तपासणी केली असता त्याच्याकडे तीन मोबाईल आढळले. त्यामुळे त्याला ठाण्यात नेऊन बोलते करण्यात आले. तेथे मोबाईल चोरीची कबुली देताना अन्सारीने आपले साथीदार जोगीनगरात राहत असल्याचे सांगितले. त्यावरून धंतोली पोलिसांनी तेथे छापा मारला. त्यावेळी पोलिसांना दोन बालकांसह ९ आरोपी सापडले. पोलिसांनी त्यांच्याकडून ४ (एकूण सात) मोबाईलही जप्त केले.पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता ही टोळी नागपूरसह ठिकठिकाणी भाड्याने राहून गर्दीच्या ठिकाणावरून मोबाईल चोरत असल्याचे उघड झाले. मोबाईल चोरताच चोरटा दुसºयाच्या आणि दुसरा तिसºयाच्या हातात देऊन दूर निघून जातो. झटपट चोरी झाल्याचे लक्षात आले तर संबंधित व्यक्ती संशयिताची झडती घेते मात्र त्याच्याकडे काहीच हाती लागत नाही. त्यामुळे पीडित तेथून निघून जातो आणिं चोरटाही सटकतो. मोबाईल चोरीत बालकांचाही पुढाकार असतो. अशा प्रकारे दर आठवड्यात किंवा पंधरवड्यात चोरलेले सर्व मोबाईल झारखंडमधील सूत्रधारांच्या हवाली केले जातात. तेथून ते बांगलादेशात पाठवून त्याची विक्री केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून या टोळीने ठिकठिकाणी चोरलेले हजारो मोबाईल बांगलादेशात पाठविले आहे. या टोळीतील चोरटे ९ सप्टेंबरपर्यंत पोलिसांच्या कस्टडीत असून त्यांच्याकडून अनेक मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलीस वर्तवित आहेत. पोलीस उपायुक्त विनिता साहू, सहायक आयुक्त राजेंद्र बोरावके यांच्या मार्गदर्शनाखाली धंतोलीचे ठाणेदार विजय आकोत यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक नरोटे, हवालदार आसिफ शेख, शिपायी वीरेंद्र गुळरांधे, विनोद कळसकर आणि देवेंद्र बोंडे यांनी ही कामगिरी बजावली.पगारदार चोरटे !एका झटक्यात ५ ते ५० हजारांपर्यंत मोबाईल चोरणारे हे चोरटे दिवसभरात किमान चार ते पाच मोबाईल चोरतात. अर्थात् सरासरी ते ४० ते ६० हजारांचे मोबाईल चोरतात. मात्र, त्यांना त्यांची किंमत पगाराच्या रुपात मिळते. ज्याने जेवढे मोबाईल चोरले, त्याला तेवढा जास्त पगार मिळतो. तो पाच ते १५ हजारांच्या दरम्यान असतो. अर्थात् कुणाला पाच हजार रुपये महिना मिळतो तर कुणाला १५ हजार रुपये मिळतात. बालकांचाही पगार याच स्वरूपात असतो.
मोबाईल चोरट्याची आंतरराज्यीय टोळी जेरबंद : सात जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 11:46 PM
ठिकठिकाणचे मोबाईल चोरून ते झारखंड मार्गे बांगलादेशात पाठविणाऱ्या मोबाईल चोरट्याची आंतरराज्यीय टोळी धंतोली पोलिसांनी जेरबंद केली.
ठळक मुद्देसूत्रधारासह दोघे पळून गेले : सात मोबाईल जप्त : धंतोली पोलिसांची कामगिरी