नागपूर : नागपूरपोलिसांच्या गुन्हे शाखेने वेश्याव्यवसायाचे आंतरराज्य रॅकेटचा भंडाफोड केला आहे. या रॅकेटचा प्रमुख पोलिसांच्या हाती लागला असून, पोलिसांनी दिल्ली व मुंबईतील दोन मुलींची सुटका केली आहे. त्याची पत्नी व इतर दोन साथीदार फरार झाले.
गुलशननगर निवासी प्रीतम कृष्णा दहीकर (वय ४३) असे आरोपीचे नाव असून त्याची पत्नी सीमा उर्फ पूजा दहीकर (३७), राज उर्फ राजेश इखान आणि समीर उर्फ किशोर शेट्टे हे फरार आहेत. प्रीतम आणि त्याची पत्नी पूजा अनेक दिवसांपासून वेश्याव्यवसाय करत होते. यापूर्वीही ते पकडले गेले आहेत. काही काळापूर्वी त्याने राज आणि समीरच्या मदतीने मोठे रॅकेट चालवण्यास सुरुवात केली. चौघेही ऑनलाइन ग्राहकांना मुली पुरवायचे. प्रीतम, त्याची पत्नी आणि राज-समीर वेगवेगळ्या संकेतस्थळावरून व्यवसाय करायचे. ते इतर शहरातून मुलींना बोलावून मोठी रक्कम गोळा करायचे. त्याची गुन्हे शाखेच्या एसएसबीला माहिती मिळाली.
डमी ग्राहकाच्या माध्यमातून त्याने आरोपींशी संपर्क साधला. आरोपीने डमी ग्राहकासोबत दोन मुलींचा नऊ हजार रुपयांना सौदा केला. आरोपींना सात हजार रुपये वर्ग करण्यात आले, तर दोन हजार जागेवर देण्यास सांगितले. सौदा झाल्यानंतर प्रीतमने गणेशपेठ येथील हॉटेल ब्रिजइन येथे रूम बुक केली. येथे मुलींची डिलिव्हरी देताच पोलिसांनी प्रीतमला पकडले. यावेळी दिल्लीतील २६ वर्षीय तरुणी आणि मुंबईतील २८ वर्षीय तरुणी सापडले आहेत. पैशाच्या लालसेपोटी दोघीही वेश्याव्यवसाय करतात.
दिल्लीतील तरुणीचे तर लग्न झाले आहे. आरोपीच्या फोननंतर दोघीही काही दिवसांपूर्वी नागपुरात आल्या होत्या. मुंबईतील मुलीला प्रीतमने आपल्या घरी ठेवले होते. उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय ललिता तोडासे, एपीआय संतोष जाधव, हवालदार अनिल अंबाडे, कॉन्स्टेबल संदीप चंगोले, राशीद शेख, भूषण झाडे, चेतन गेडाम, लक्ष्मण चौरे, मनीष रामटेके, प्रतिमा मेश्राम यांनी ही कारवाई केली.