लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध राज्यात चोरी-घरफोडी करून प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात शेट्टी टोळीतील तीन गुन्हेगारांना अटक करण्यात अजनी पोलिसांनी यश मिळवले. त्यांच्याकडून रोख आणि दागिन्यांसह पावणेतीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. आठ जणांच्या या टोळीतील पाच जण फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.४ मेच्या पहाटे ३ च्या सुमारास अजनी पोलीस सुयोगनगरात गस्त करीत असताना चार संशयित व्यक्ती पोलिसांचे वाहन पाहून पळून जाताना दिसले. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून चारपैकी तिघांना पकडले. प्रभू सुब्रम्हण्यम सनीपती (वय ३२, रा. सेवापेठ, जि. गुंटूर, तामिळनाडू ), व्यंकटेश वेल्यदेन कोरवन (वय ५४, रा. क्लोटमनपतूर, जि. वेल्लोर) आणि मुरली ऊर्फ रोशन परसरामन किल्लन (वय २६, रा. कल्लोट, जि. वेल्लोर, तामिळनाडू) अशी त्यांची नावे आहे. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी काही दागिने आणि रोख तसेच पॅशन जप्त केली. हा मुद्देमाल अभयनगरातील हर्शल मांजरे यांच्या घरातून चोरला होता, अशी आरोपींनी कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा पीसीआर मिळवून चौकशी केली असता हे आरोपी त्यांच्या अन्य पाच साथीदारांसह मानेवाड्यातील महाकालीनगरात भाड्याच्या खोलीत राहत होते, असे स्पष्ट झाले.जानेवारी २०१८ पासून ३ मे पर्यंत त्यांनी अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच तर हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी घरफोडी करून लाखोंचा ऐवज चोरल्याचे सांगितले.त्यातील काही रक्कम, सोने, चांदी आणि इतर मौल्यवान चीजवस्तू या आरोपींच्या साथीदारांनी आपापल्या गावाला रवाना केल्या. तर, अटकेतील आरोपींकडून पोलिसांनी रोख, सोन्याचांदीचे दागिने तसेच हिरोहोंडा पॅशन एमएच ३१/ सीयू ११०१ तसेच अन्य काही चीजवस्तूंसह २ लाख, ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.चंद्रपुरातही धुमाकूळया टोळीतील चोरट्यांनी गेल्या वर्षी चंद्रपुरातही धुमाकूळ घातला होता. तेथे १५ गुन्हे केल्यानंतर ही टोळी पोलिसांच्या हाती लागली होती. हे सर्वच्या सर्व आरोपी तामिळनाडूतील असले तरी त्यांचा उपद्रव सर्वाधिक महाराष्ट्रात आहे. टोळीचा म्होरक्या शेट्टी नामक आरोपी आहे. त्यामुळे या टोळीला शेट्टी गँग आणि अण्णा गँग म्हणून पोलीस ओळखतात. जानेवारी २०१८ मध्ये ही टोळी चंद्रपुरातील गुन्ह्यांच्या आरोपातून कारागृहातून बाहेर आली. त्यानंतर या टोळीने नागपुरात भाड्याचे घर घेऊन विविध भागात घरफोडीचे गुन्हे केले.चेन्नईला पळून जाणार होते४ मे च्या रात्री जास्तीत जास्त चोऱ्या-घरफोड्या करून ही टोळी ५ मे रोजी चेन्नईला पळून जाणार होती. त्यांनी ८ जणांचे रेल्वे तिकीट काढले होते. मात्र, एक दिवस अगोदरच पोलिसांनी या आठपैकी तिघांच्या मुसक्या बांधल्या. पाच जण मात्र पळून गेले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आणखी बराचसा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागू शकतो. शहरातील विविध पोलीस ठाण्यातील मंडळी शेट्टी गँगला पकडण्यासाठी कामी लागली असताना परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली, अजनीचे ठाणेदार शैलेश संख्ये, द्वितीय निरीक्षक ए. पी. सिद यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक एन. बी. गावंडे, पीएसआय बनसोडे, भुते, हवलदार रामचंद्र कारेमोरे, अनिल ब्राह्मणकर, सुरेश शेंडे, रतन बागडे, निलेश्वर तितरमारे, शैलेश प्रशांत आणि मनोज यांनी ही कामगिरी बजावली.