नागपूर : घरफोडी करून लाखोंचे सोने तसेच रोकड लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची टीप बियर बारमध्ये मिळाली. त्यावरून पोलिसांनी त्यांच्या मुसक्या बांधून त्यांच्याकडून साडेचार लाखांचे सोने जप्त केले. सोमेश्वर उर्फ कान्हा मोरेश्वर कान्होलकर (२२) आणि प्रीतम उर्फ चिडी आलोक उईके (२२) अशी या गुन्हेगारांची नावे आहेत.
तीन दिवसांपूर्वी हुडकेश्वरमधील चंद्रशेखर झाडे यांच्याकडे कान्हा आणि चिडी या दोघांनी घरफोडी केली. सुमारे साडेचार लाखांचे सोने तसेच रोकड या दोघांनी लंपास केली. मोठा माल हाती लागल्यामुळे दोन दिवस त्यांनी बियर बारमध्ये नोटा उडवल्या. मोठ्या प्रमाणात दारू पिल्यानंतर ते बरळू लागले. त्याची माहिती हुडकेश्वर पोलीस ठाण्यातील हवालदार मनोज नेवारे यांना मिळाली. त्यांनी ती ठाणेदार सार्थक नेहते यांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना बुधवारी ताब्यात घेतले.
त्यांची खातिरदारी केल्यानंतर त्यांनी झाडे यांच्याकडे घरफोडी केल्याचे कबूल करून लंपास केलेले मंगळसूत्र, अंगठी, कानातील वेल, बांगड्या, चपलाकंठी हार असे एकूण साडेचार लाख रुपयांचे सोने पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी ते जप्त केले.
पाच दिवसांची कोठडी
या भामट्यांनी आणखी किती आणि कुठे गुन्हे केले, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्यांची न्यायालयातून पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळवली. पोलीस उपायुक्त नुरुल हसन, सहाय्यक आयुक्त गणेश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सार्थक नेहते, द्वितीय निरीक्षक चित्तरंजन चांदोरे, एपीआय स्वप्नील भुजबळ तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.
---