निशांत वानखेडे
नागपूर : गावाेगावी भटकंती करून जडीबुटीची औषधी विकणाऱ्या वैदू समाजातील १५ कुटुंबांना गावातून हाकलून लावण्यासाठी गावकरीच उठले आहेत. माैदा तालुक्यातील नरसाळा गटग्रामपंचायतीअंतर्गत कुंभापूर या गावी हा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. या १५ कुटुंबातील ७५ माणसे मागील १० वर्षांपासून या गावात वास्तव्यास आहेत. नरसाळा गटग्रामपंचायतीच्या सदस्यांनी या भटक्या जमातीतील लाेकांना गावाबाहेर हाकलण्याचा ठरावच पारित केला आहे. संविधानिक मानवाधिकाराचे सर्रास हनन हाेत असताना प्रशासन मात्र मूग गिळून बसले आहे.
जंगलातील औषधी जडीबुटी आणून त्याची औषधी बनवून गावाेगावी विकणे हे या वैदू समाजाचे पारंपरिक काम. इंग्रजपूर्व काळात हाेणाऱ्या युद्धात जखमी सैनिकांवर जडीबुटीच्या औषधाने उपचार करण्याचा त्यांचा हातखंडा हाेता. ‘राज गेले की राजपाट जाते’, असे म्हणतात. तशीच अवस्था या वैदू समाजाची झाली आहे. ना सरकारी दप्तरात नाेंद, रेशन कार्ड, व्हाेटिंग कार्ड, आधार कार्ड अशी सरकारी नाेंदही नाही. यांची मुलेही कधी शाळेत गेली नाहीत. कुठे एखाद्या गावी बस्तान बसविले तर गावकरीही त्यांना राहू देत नाहीत.
असाच प्रकार कुंभापूर गावी घडत आहे. हे गाव तसे कन्हान नदीच्या पूरग्रस्त भागात येते. त्यामुळे या जागेवर सरकारी याेजना राबविल्या जात नाहीत. अशा जागेवर या कुटुंबांनी १० वर्षांपासून बस्तान बसविले आहे. मात्र, आता गावकरी त्यांच्या जीवावर उठले आहेत. नरसाळा ग्रामपंचायतीने यांना गावातून हाकलण्याचा ठराव पारित केला आणि या लाेकांना दाेन दिवसांत जागा खाली करण्याचे नाेटीसही बजावले. ही बाब लक्षात आल्यानंतर संघर्ष वाहिनीची टीम या गावात गेली तेव्हा १५ वैदू कुटुंबांवर हाेत असलेल्या अन्यायाचे विदारक वास्तव समाेर आले. संघटनेचे दीनानाथ वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार या लाेकांना चाेर ठरवून गावातून हाकलण्यासाठी ग्रामस्थ सरसावले आहेत. याबाबत त्यांनी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांशी चर्चा केली पण त्यांनी व्यथा ऐकून घ्यायला नकार दिला. त्यांनी तहसीलदारांची भेट घेतली. पण त्यांच्याकडूनही समाधान झाले नाही. तेव्हा या लाेकांनी जावे कुठे, असा सवाल वाघमारे यांनी केला.
भटक्यांना स्वातंत्र्याचे ‘अमृत’ कधी?
तहसीलदारांची भेट घेतली असता त्यांनी वैदू कुटुंबांना सहा महिन्यांची मुदत दिली. त्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यास सांगितले. मात्र, त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी काेण घेणार की त्यांना येथून पळावे लागेल, असा सवाल वाघमारे यांनी उपस्थित केला. ते या देशातील लाेक नाहीत का, त्यांना शासकीय याेजनांचा लाभ कधी मिळेल, त्यांना गावातून हाकलण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला कुणी दिला, असे प्रश्न त्यांनी विचारले. स्वातंत्र्याचा अमृत महाेत्सव साजरा हाेत असताना या भटक्यांना स्वातंत्र्याचे अमृत कधी मिळेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
यांची मुले आली तर आमची मुले शाळेतून काढू
या वैदूंच्या कुटुंबात २५ शाळाबाह्य मुले आहेत. संघर्ष वाहिनीने याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. शिक्षण समन्वयक प्रसेनजित गायकवाड यांनी स्थानिक शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटून मुलांना दाखल करण्यास सांगितले. मात्र, या मुलांना शाळेत घ्याल तर आम्ही आमची मुले शाळेतून काढू, असा सज्जड इशारा गावकऱ्यांनी दिला. इतका टाेकाचा भेदभाव का, असा सवाल येताे. सध्यातरी वयानुसार मुख्याध्यापक व अंगणवाडी सेविकांनी मुलांची नाव नाेंदणी केली आहे. पण पुढे काय हाेईल, याबाबत शंका आहे.