लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरातील वनविभागाच्या विविध कार्यालयांमध्ये वन्यजीवांची मृगया चिन्हे (ट्रॉफीज) पडून आहेत. या सोबत नागरिकांकडे असलेली मृगया चिन्हेही वन विभागाने विशेष मोहिमेतून जमा केली आहेत. प्रक्रियेविना पडून असलेल्या या चिन्हांची वेळीच दखल घेतली नाही तर हा अमूल्य ठेवा बिनकामाचा होऊ शकतो. वनमंत्री संजय राठोड यांनी याची दखल घेण्याची तयारी दर्शविल्याने या चिन्हांना झळाळी येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
वनविभागाकडे बऱ्याच काळापासून वाघ, बिबट, अस्वल, बायसन, चितळ, सांबर, कोल्हा, लांडगा यासह अनेक पक्ष्यांची मृगया चिन्हे आहेत. हा अनमोल ठेवा असल्याने त्यांचे वैज्ञानिकदृष्ट्या जतन व्हावे, याकरिता वनविभागाने पाऊल उचलले आहे. दि हेरिटेज कन्झर्व्हेशन सोसायटी आणि वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने या चिन्हावर आता यापुढे प्रक्रिया होणार आहे.
दि हेरिटेज कन्झर्व्हेशन सोसायटीच्या संचालक लीना हाते झिलपे यांच्या पुढाकारात हे काम सुरू झाले आहे. वनमंत्री संजय राठोड यांनी बुधवारी या प्रकल्पाला भेट देऊन सर्व वैधानिक प्रक्रियेबाबत माहिती जाणून घेतली.हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आवश्यक ती शासकीय मदत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. राज्यातील वनविभागाच्या इतर ठिकाणी असलेल्या ट्रॉफीज येथे आणून त्यावर सुद्धा रासायनिक प्रक्रिया करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर, मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार, उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ल आदींच्या पुढाकारातून दि हेरिटेज कन्झर्व्हेशन सोसायटीच्या कामाला सुरुवात झाली आहे.
गोरेवाडामध्ये ट्रॉफीजच्या संग्रहालयाची संकल्पनाराज्यभरातील प्राणी आणि पक्ष्यांच्या ट्रॉफीज प्रक्रियेसाठी आणून त्यांचे गोरेवाडा येथे संग्रहालय तयार करण्याची संकल्पना सध्या वन विभागाच्या विचाराधीन आहे. देशात सध्या असे एकही संग्रहालय नाही, यापूर्वी दिल्लीतील संग्रहालय आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतर अशी उभारणी देशात झाली नसल्याची माहिती आहे.
सर्व ट्रॉफीज इंग्रजकालीनसध्या उपलब्ध असलेल्या सर्वच ट्राफीज इंग्रजकालीन आहेत. १९७२ पूर्वीच्या त्या असल्याची नोंद आहे. त्या काळात अस्तित्वास असलेल्या ब्रिटिश कंपनीने या ट्रॉफीजची निर्मिती केली असल्याची माहिती आहे.