न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूची चौकशी करा : हायकोर्टात याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 10:48 PM2018-01-17T22:48:42+5:302018-01-17T22:52:44+5:30
मुंबईतील सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल हरकिशन लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात यावे, अशा विनंतीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबईतील सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल हरकिशन लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात यावे, अशा विनंतीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. लोया यांचा १ डिसेंबर २०१४ रोजी नागपुरात मृत्यू झाला होता. या प्रकरणावर २२ जानेवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
योगेश नागपुरे असे याचिकाकर्त्याचे नाव असून, ते व्यवसायाने वकील आहेत. विविध वृत्तपत्रांमध्ये लोया यांच्या मृत्यूसंदर्भात विसंगतीपूर्ण बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. त्यामुळे लोया यांच्या मृत्यूचे गुढ वाढले. बातम्यांवरून लोया यांच्या मृत्यूशी संबंधित कागदोपत्री पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते. तसेच, प्रकरणाशी संबंधित साक्षीदारदेखील प्रभावित केल्याचा संशय व्यक्त होत आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, साक्षीदारांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह विभागाचे सचिव, नागपूर पोलीस आयुक्त, सदरचे पोलीस निरीक्षक आदींना प्रतिवादी करण्यात आले आहे.