नागपूरच्या राजापेठ येथे झालेल्या पीयूष घोडे मृत्यूची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 08:53 PM2018-03-14T20:53:20+5:302018-03-14T20:53:31+5:30
राजापेठ येथील पीयूष श्रीकांत घोडे या १२ वर्षीय मुलाच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी व उपचार नाकारणाऱ्या खासगी दोषी डॉक्टर्सवर गुन्हे नोंदविण्यात यावे यासाठी अॅड. आयुष शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजापेठ येथील पीयूष श्रीकांत घोडे या १२ वर्षीय मुलाच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी व उपचार नाकारणाऱ्या खासगी दोषी डॉक्टर्सवर गुन्हे नोंदविण्यात यावे यासाठी अॅड. आयुष शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.
घटनेच्या दिवशी रात्री लोखंडी टिन भरलेला मिनी ट्रक राजापेठ येथे वळण रस्त्यावर उभा होता. टिनांवर धोक्याचा इशारा देणारी कोणतीही खूण लावण्यात आली नव्हती. परिसरात सायकल चालवित असताना पीयूष या टिनांना धडकला. त्यामुळे त्याचा गळा चिरला. त्यानंतर त्याला मानेवाडा रोडवरील आपुलकी वैरागडे रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, या रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले नाही. तेथून त्याला अन्य खासगी रुग्णालयात नेले असता कुणीच उपचाराची तयारी दर्शविली नाही. शेवटी त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, तेव्हापर्यंत विलंब झाला होता. मेडिकलमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांनी उपचार केले असते तर, पीयूषचे प्राण वाचू शकले असते, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. त्यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची व चौकशीत दोषी आढळून येणाºया डॉक्टर्सवर गुन्हे नोंदविण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.
पोलीस व डॉ. वैरागडे यांना नोटीस
न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांनी बुधवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर पोलीस आयुक्त, हुडकेश्वर पोलीस निरीक्षक व आपुलकी वैरागडे रुग्णालयाचे डॉ. सुशील वैरागडे यांना नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. अवधेश केसरी यांनी बाजू मांडली.