रुग्णालय तोडफोडीचा सीआयडीमार्फत तपास करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 08:38 PM2019-02-25T20:38:28+5:302019-02-25T20:41:41+5:30
कुही येथील डॉ. विलास सेलोकर यांचे रुग्णालय व घरातील तोडफोड आणि दरोड्याचा सीआयडीमार्फत तपास करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल याचिकेत करण्यात आली आहे. डॉ. सेलोकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुही येथील डॉ. विलास सेलोकर यांचे रुग्णालय व घरातील तोडफोड आणि दरोड्याचा सीआयडीमार्फत तपास करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल याचिकेत करण्यात आली आहे. डॉ. सेलोकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.
२० नोव्हेंबर २०१८ रोजी सेलोकर यांच्या साक्षी क्लिनिकमध्ये केजू गोरबडे या रुग्णाचा अकस्मात मृत्यू झाला. त्यानंतर त्याचे नातेवाईक व इतरांनी सेलोकर यांचे रुग्णालय, कार व घरातील साहित्यांची तोडफोड करून लाखो रुपयांचे नुकसान केले. तसेच, दागिने व रोख रक्कम चोरून नेली. त्यानंतर सेलोकर यांनी पोलिसांकडे तक्रार केली असता आरोपींविरुद्ध तातडीने एफआयआर नोंदविण्यात आला नाही. उलट रुग्णालय व घराला सील लावण्यात आले आणि सेलोकर व त्यांच्या कुटुंबीयांना दोन दिवस पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्या गेले. त्यामुळे सेलोकर यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी दिली. पोलीस अधीक्षकांच्या निर्देशावरून पोलिसांनी १४ जानेवारी २०१९ रोजी आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवला असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणावर सोमवारी न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने प्रकरणातील प्राथमिक तथ्ये लक्षात घेता रुग्णालय व घराचे सील तातडीने उघडण्याचा आदेश दिला. तसेच, सील लावण्यासाठी कोण जबाबदार आहे यावर उत्तर सादर करावे असे कुही पोलीस निरीक्षक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सांगितले. सेलोकर यांच्यातर्फे अॅड. नीलेश गायधने यांनी कामकाज पाहिले.