लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हत्या, अपहरण, खंडणी वसुली, फायरिंग या आणि अशाच अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी, उपराजधानीतील खतरनाक गुन्हेगार मोहम्मद नौशाद पीर मोहम्मद खान (वय २८) याची आम्ही नक्षल लिंक तपासणार आहोत. त्याने दीड वर्षांच्या फरारीच्या कालावधीत कुठे काय केले, त्याचीही कसून चौकशी केली जाणार असून, त्याच्याकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे, असे परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पाचपावली पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी कुख्यात नौशादच्या सिनेस्टाईल मुसक्या बांधल्या. यावेळी पळून जाण्यासाठी नौशादने पोलिसांना पिस्तूल आणि चाकूचा दाखवत पोलिसांशी झटापट केली होती. त्यात एका पोलीस कर्मचाऱ्याला चाकू लागला होता. या धाडसी कामगिरीची दखल घेत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ठाणेदार मेश्राम तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना ७५ हजारांचा रोख रिवॉर्ड घोषित केला. या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त माकणीकर यांनी पाचपावली ठाण्यात एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी सहायक आयुक्त वालचंद मुंढे आणि नौशादच्या मुसक्या बांधण्याची धाडसी कामगिरी बजावणारे पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम उपस्थित होते.नौशाद आणि त्याचा भाऊ इप्पा नागपुरात खतरनाक गुन्हेगारांच्या टोळ्यांपैकी एक असलेली ‘इप्पा गँग’ चालवितो. नौशाद आणि इप्पा दोघेही अत्यंत क्रूर आहेत. त्यांच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, जमिनी बळकावणे, अपहरण, खंडणी वसुली करणे, पोलिसांवर हल्ले करणे, अमली पदार्थ तस्करी, पिस्तुलासह घातक शस्त्रे बाळगणे, फायरिंग करणे, असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी पोलिसांनी त्यांच्यावर एमपीडीए, मकोका, तडीपारीसारखी कारवाई केली. मात्र, त्यांच्या गुन्हेगारी वृत्तीत फरक पडला नाही. दीड वर्षांपूर्वी नौशादविरुद्ध तहसील पोलिसांनी लावलेल्या मकोकानंतर तो फरार झाला. सहा महिन्यांपूर्वी तो घरी परतल्याचे कळाल्याने त्याला अटक करण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर आणि सहकाऱ्यांवर नौशाद आणि त्याच्या साथीदारांनी जोरदार हल्ला चढवला होता. पोलिसांच्या वाहनांचीही तोडफोड केली होती. पाचपावली ठाण्यात याप्रकरणी हत्येचा प्रयत्न करणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून नौशादचा पोलीस शोध घेत होते.जानेवारी महिन्यात पाचपावली पोलीस नौशादला पकडण्यासाठी अजमेर राजस्थानपर्यंत गेले. त्यावेळी त्याचे १२ साथीदार पोलिसांच्या हाती लागले, मात्र नौशाद पळून गेला होता. शुक्रवारी सायंकाळी नौशाद त्याच्या घरी परतल्याचे कळताच ठाणेदार अशोक मेश्राम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह धाव घेत नौशादच्या नोगा कंपनी, मोतीबागमधील घराला वेढा घातला. ते लक्षात येताच नौशाद पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. तो नेहमी पिस्तूल किंवा चाकू जवळ बाळगतो, हे माहीत असल्याने पोलीस तयारीतच होते. त्यामुळे पळून जाण्याचा प्रयत्न करणाºया नौशादवर झडप घालून पोलिसांनी त्याच्या कंबरेला खोचलेले पिस्तूल आणि चाकू हिसकावून घेतला. यावेळी झालेल्या झटापटीत पोलीस कर्मचारी राजेश देशमुखला चाकू लागला. नौशाद फरारीच्या कालावधीत कुठे होता, त्याने कोणते गुन्हे केले. मध्यंतरी त्याचे नक्षली भागातील गुन्हेगारांसोबत वावरणे होते, त्यामुळे तो नक्षल्यांच्या संपर्कात आला का, त्याने फरारीच्या कालावधीत कुठे, कोणते गुन्हे केले, त्याची चौकशी आम्ही करीत असल्याचेही उपायुक्त माकणीकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.वस्तीत प्रचंड तणावनौशाद जेथे असतो, त्याच्या अवतीभवती त्याचे गुंड साथीदार घुटमळत असतात. त्याला पकडण्यासाठी पोलीस आले की त्याचे साथीदार वस्तीतील महिलांना समोर करून दगडफेक करणे, वाहनांना अडविणे, पोलिसांची कोंडी करून त्यांना मागे फिरण्यास बाध्य करणे, असे फंडे वापरतात. शुक्रवारी तसेच झाले. नौशादला पोलिसांनी जेरबंद करताच मोठ्या संख्येत महिला-पुरुष समोर आले आणि त्यांनी पोलिसांवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आधीच तयारीत असलेल्या पोलिसांनी नौशादला आपल्या वाहनात कोंबून पोलीस ठाण्यात पोहोचविले. तिकडे अतिरिक्त पोलीस बळ (आरसीपी) बोलवून त्याच्या घराची झडती घेतली. यावेळी वस्तीतील त्याचे १०० ते १५० उपद्रवी साथीदार घोषणाबाजी करीत असल्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी चिथावणी देणाºया मुमताजबी नामक महिलेला ताब्यात घेताच बाकी सर्व पळून गेले.नौशादला अटक करताना पोलिसांनी दाखविलेली आक्रमकता पत्रकार परिषदेत चर्चेला आली असता, यापुढे पोलीस असेच आक्रमक राहतील आणि गुन्हेगारी मोडून काढतील, असे माकणीकर म्हणाले. गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू असून, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टॉप टेन गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली असून, गुन्हेगारांना त्यांच्या योग्य ठिकाणी पाठविण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असल्याचेही उपायुक्त माकणीकरांनी सांगितले.पिस्तूल, दोन कट्टे अन् रिवॉर्डताब्यात घेतेवेळी नौशादजवळून पोलिसांनी एक पिस्तूल आणि चाकू जप्त केला होता. घरझडतीत आणखी दोन देशीकट्टे आणि पाच जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केले. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी कुख्यात नौशादला अटक करण्याची धाडसी कामगिरी बजावणारे पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम, एपीआय सुरोशे, पीएसआय गोडबोले, शिसोदे तसेच कर्मचारी सुभाष सौंदरकर, राजकुमार शर्मा, राजेश देशमुख, ज्ञानेश्वर जाधव, विनोद बरडे, राकेश तिवारी, जितेंद्र खरपुरिया, महेश जाधव, विलास चव्हाण, विनोद गायकवाड आणि दीपक सराटे या पोलिसांचे कौतुक केले. त्यांना ७५ हजारांचा रिवॉर्डही घोषित केला.
कुख्यात नौशादची नक्षल लिंक तपासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 8:26 PM
हत्या, अपहरण, खंडणी वसुली, फायरिंग या आणि अशाच अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी, उपराजधानीतील खतरनाक गुन्हेगार मोहम्मद नौशाद पीर मोहम्मद खान (वय २८) याची आम्ही नक्षल लिंक तपासणार आहोत. त्याने दीड वर्षांच्या फरारीच्या कालावधीत कुठे काय केले, त्याचीही कसून चौकशी केली जाणार असून, त्याच्याकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे, असे परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ठळक मुद्देपळून जाण्याच्या प्रयत्नात पोलिसांशी झटापट :नागपूरच्या पाचपावली पोलिसांनी केली सिनेस्टाईल अटक