राहुल तिवारीच्या मृत्यूचा सखोल तपास करा : हायकोर्टात याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 07:24 PM2019-09-19T19:24:02+5:302019-09-19T19:26:37+5:30
जी. एस. महाविद्यालयाचा विद्यार्थी राहुल तिवारी याच्या मृत्यूचा सखोल तपास करण्यात यावा अशा विनंतीसह वडील राधारमण तिवारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जी. एस. महाविद्यालयाचा विद्यार्थी राहुल तिवारी याच्या मृत्यूचा सखोल तपास करण्यात यावा अशा विनंतीसह वडील राधारमण तिवारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने व प्रामाणिकपणे करण्यात आला नाही असा त्यांचा आरोप आहे.
न्यायालयाने याचिकेवर सुनावणी केल्यानंतर पोलीस आयुक्त व गुन्हे शाखेला नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ही घटना गेल्यावर्षी घडली होती. राहुल इयत्ता बारावीला होता. २ ऑगस्ट २०१८ रोजी त्याचा वर्गातील अन्य विद्यार्थी अजय तुरकर याच्यासोबत वाद झाला. दुपारी ३.४५ च्या सुमारास त्यांची हातापायी झाली. दरम्यान, अजयने राहुलची मान घट्ट पकडून ठेवली. त्यामुळे त्याचा श्वास रोखला गेला व काही वेळाने त्याचा मृत्यू झाला. आरोपीला शिक्षा होण्यासाठी प्रकरणाचा सखोल तपास होणे आवश्यक आहे असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.