लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विदर्भात मोठा शिक्षक भरती घोटाळा समोर आला आहे. शासनाच्या बगलबच्च्यांना अनेक शाळा, कॉलेज या लोकांना व त्यांच्या कुटुंबीयांना फायदा देण्यासाठी देण्यात आल्या आहेत. आता हा घोटाळा शासन प्रशासनावर ढकलत आहेत; पण यासाठी तेवढेच शासनकर्ते देखील दोषी आहेत. त्यामुळे या घोटाळ्याची एसआयटीमार्फतच नव्हे, तर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी केली.
तिरोडा येथे रविवारी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. आ. पटोले म्हणाले, पुढील काळात यांच्या सरकारचे असे अनेक घोटाळे बाहेर येणार आहेत. एका प्रश्नाच्या उत्तरात शेतकरी कर्जमाफीवर आ. नाना पटोले म्हणाले की, पुढील काळात शेतकरी या सरकारला यांची जागा दाखविल्याशिवाय सोडणार नाही, सरकारच्या घोषणांमुळे, पापामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून २० हजार रुपये हेक्टरी बोनस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या सरकार स्थापन व्हायला आता चार महिन्यांचा कालावधी उलटूनदेखील शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप बोनस जमा झालेला नाही. ही शेतकऱ्यांची दिशाभूल असून या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहे.