लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाला मात दिलेल्या लोकांसाठी गेल्या सोमवारपासून जिल्ह्यात विशेष तपासणी अभियान सुरू करण्यात आले आहे. अभियानांतर्गत पहिल्या दोन दिवसात ८५० लाेकांशी संपर्क साधण्यात आला. तसेच २७४ लोकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ही माहिती दिली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात आरोग्य उपकेंद्र, तालुका उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना आजारापासून बरे झालेल्या लोकांसाठी पोस्ट कोविड ओपीडी सुरु करण्यात आली आहे. यात दररोज दुपारी १२ ते १ या वेळात अश रुग्णांची तपासणी केली जात आहे. यात रुग्णांना योग्य मार्गदर्शनही केले जात आहे.
मास्क न घातल्यास दंड
जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना मास्क न घातल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यास दंड लावला जाईल. स्वत: व आपल्या परिवाराच्या सुरक्षेसाठी नागरिकांनी स्वच्छता ठेवणे व सॅनिटायझरचा उपयोग करण्याचे आवाहनही केले आहे.
प्लाझ्मा दान करण्यासाठीही पुढाकार
ओपीडीच्या पहिल्या दोन दिवसात कोरोनातून बरे झालेल्या ४ लोकांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी सहमती दर्शविली आहे. आरोग्य विशेषज्ज्ञांचे मानणे आहे की, कोविड-१९ च्या उपचारात प्लाझ्मा थेरेपी उपयुक्त ठरत आहे. जिल्हाधिकारी ठाकरे याांनी नागरिकांना प्लाझ्मा दान करण्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे.