नरेश डोंगरे -
नागपूर : ९ जिवांचे बळी घेणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीतील स्फोटाच्या घटनेनंतर सरकारी यंत्रणांकडून ठिकठिकाणच्या स्फोटकांच्या (एक्सप्लोसिव्ह) कंपन्यांमधील गैरकारभाराची गोपनिय पद्धतीने चाैकशी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, नागपूर-विदर्भातील अनेक जिल्ह्यातील स्फोटकांच्या कारखान्यात आकस्मिक भेटी देऊन संबंधित अधिकाऱ्यांच्या पथकाने तेथील तपासणी केल्याची माहिती आहे. अनेक कंपन्यांनी कामगारांच्या जिवाचा खेळ मांडल्याचे धक्कादायक वास्तव या तपासणीतून पुढे आले असून, या कंपन्यातील गलथाणपणाचा 'स्फोटक अहवाल' तयार होत असल्याची खास सूत्रांची माहिती आहे.
नागपूर जिल्ह्यातील धामना-लिंगा या छोट्याशा गावात असलेल्या चामुंडी एक्सप्लोसिव्ह प्रा. लि. कंपनीत १३ जूनला भीषण स्फोट झाला होता. त्यात प्राची श्रीकांत फलके (१९), वैशाली आनंदराव क्षीरसागर (२०), प्रांजली किसनाजी मोंदरे (२२), मोनाली शंकरराव अलोने (२५), शीतल आशिष चटप (३०), श्रद्धा वनराज पाटील (२२, सर्व रा. धामना), पन्नालाल बंदेवार (६०, रा. सातनवरी) दानसा मरसकोल्हे (२६, रा. मध्य प्रदेश) आणि प्रमोद चवारे (२५, रा. नेरी) या ९ जणांचा बळी गेला होता.या स्फोटापूर्वी चामुंडी कंपनीत सुरक्षेच्या कसल्याही उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. स्फोटके हाताळणाऱ्या कामगारांना मृत्यूच्या जबड्यात ढकलून देणाऱ्या या कंपनीत प्रशासनाने साधी आग विझविण्याची सोय करून ठेवली नव्हती. रुग्णवाहिकादेखिल तेथे उपलब्ध नव्हती. त्यामुळे स्फोटात गंभीर जखमी झालेल्या तरुण-तरुणींना अनेक तास कंपनीच्या आवारातच जिवघेण्या वेदना सहन कराव्या लागल्या. ते तडफडत असताना कंपनी प्रशासनाने तातडीने उपचाराची व्यवस्था करून दिली नाही. त्याचमुळे त्यांचा मृत्यू झाला. या भीषण घटनेनंतर 'लोकमत'ने या घटनेशी संबंधित अनेक पैलू उघड केले. त्यासंबंधाने समाजाच्या सर्वच क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर या स्फोटाच्या घटनेची तसेच या कंपनीसह स्फोटकांच्या नागपूर विदर्भातील कंपन्यातील गलथानपणाची चाैकशी करण्यासाठी एक समिती निर्माण करण्यात आली. या पार्श्वभूमीवर, नागपूर विदर्भातील २४ कंपन्यांची पोलीस, औद्योगिक सुरक्षा विभाग, आरोग्य विभाग आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोपनिय चाैकशी केल्याची माहिती आहे.अधिकाऱ्यांकडून ओठावर बोट -या संबंधाने पोलीस तसेच अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी यावर बोलण्याचे टाळले. काही अधिकाऱ्यांनी तर फोनच उचलण्याचे टाळले. तर, ही चाैकशी वरिष्ठ पातळीवर असल्याने आमचे या संबंधाने काहीही बोलणे योग्य नसल्याचे काही अधिकारी म्हणाले.
...तर, विधिमंडळात अहवाल! -विशेष म्हणजे, सध्या राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. स्फोटकाच्या अनेक कंपन्यात गलथानपणा चाैकशी करणाऱ्यांना आढळला असून, त्यामुळे कामगारांच्या जिवाला धोका होण्याची भीती अधोरेखित झाल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. त्यासंबंधाने एक 'स्फोटक अहवाल' तयार होत आहे. अधिवेशनात चामुंडीच्या कंपनीतील स्फोटाचा मुद्दा उपस्थित झाल्यास हा अहवाल उत्तरादाखल सादर केला जाऊ शकतो, अशीही खास सूत्रांची माहिती आहे.