लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) बालरोग विभागातील नवजात बालकांवरील उपचार केंद्रात (न्यओनॅटल केअर युनिट) ३१ ऑगस्टच्या रात्री पाऊणे तीन वाजताच्या सुमारास ‘शॉर्ट सर्किट’मुळे आग लागल्याने खळबळ उडाली. कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने वेळीच धाडस दाखविल्याने नऊ नवजात बालकांचा जीव वाचला. या प्रकरणाची वैद्यकीय शिक्षण विभाग व संचालनालयाने (डीएमईआर) दखल घेतली आहे. संबंधित प्रकरणाचा अहवाल पाठविण्याची सूचना अधिष्ठात्यांना केल्या आहेत.मेयोच्या स्त्री रोग व प्रसूती विभागाच्या इमारतीत प्रसूती कक्षासमोर बालरोग विभागाचे पूर्वीचे ‘पीबीयू’ तर आताचे ‘एनआयसीयू’ कक्ष आहे. जन्माला आलेल्या कमी वजनाच्या व श्वास घेता येत नसलेल्या नवजात बालकांना तातडीने उपचार करता यावा म्हणून सहा खाटांचे ‘एनआयसीयू’ कक्ष उभारण्यात आले आहे. परंतु खाटांच्या तुलनेत नेहमीच बालके जास्त असतात. यातच हा कक्ष आतमध्ये आहे. ३१ ऑगस्टच्या मध्यरात्री या कक्षात अचानक ‘शॉर्ट सर्किट’मुळे आग लागली. काही कळण्याच्या आत कक्ष धुराने भरला. कक्षात तीन नवजात बालके ऑक्सिजन, दोन बालके ‘वॉर्मर’ यंत्रावर तर चार बालके उपचाराखाली होते. कर्तव्यावर असलेल्या स्टाफ नर्स सविता ईखार यांनी प्रसंगावधान दाखवून दोन्ही हातात दोन-दोन बालकांना घेऊन बाहेर धाव घेतली. जवळच्या प्रसूती कक्षाच्या बाजूला असलेल्या डॉक्टरांच्या खोलीत त्यांना ठेवले. त्यानंतर दुसऱ्या बालकांना वाचविण्यासाठी पोहचल्या. जे बालके ऑक्सिजनवर होती त्यांचे ऑक्सिजन बंद केले. यामुळे पुढील अनर्थ टळला. याचवेळी त्यांच्या मदतीला इतरजणही धावले. यामुळे नऊही बालके सुरक्षित स्थळी पोहचली. घटनेची माहिती होताच बालरोग विभागाच्या डॉक्टरांनीही धाव घेतली. जी बालके ऑक्सिजनवर होती त्यांना पुन्हा ऑक्सिजनवर घेतले, इतरांवरही उपचार सुरू करून वॉर्डात हलविले. या घटनेने मात्र विद्युत व्यवस्थेचा कारभार चव्हाट्यावर आला. मेयो प्रशासनाने बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाला या घटनेचे स्पष्टीकरण मागितले आहे. ‘लोकमत’ने याबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना सांगितले आहे. यामुळे काय उपाययोजना होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मेयोच्या आगीची ‘डीएमईआर’कडून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 7:41 PM
मेयोच्या आगीची वैद्यकीय शिक्षण विभाग व संचालनालयाने (डीएमईआर) दखल घेतली आहे. संबंधित प्रकरणाचा अहवाल पाठविण्याची सूचना अधिष्ठात्यांना केल्या आहेत.
ठळक मुद्देनऊ नवजात बालकांचा थोडक्यात वाचला जीव